पंढरपूर: सरकारने मला 'ईडी'ची भीती दाखवू नये. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नसून मी तुमच्या 'ईडी'लाच 'येडी' करून टाकीन, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारले. ते शुक्रवारी पंढरपूर येथे भारत भालके यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या विरोधात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका केली.
'एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे'
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे. सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. मात्र, सरकारने मला ईडीची भीती दाखवू नये. मी तुमच्या 'ईडी'ला येडा केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
'मी काय केले विचारता, मग पद्मविभूषण कशासाठी दिलात?'
चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी माहाराजांचा धडा काढून टाकण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. सत्तेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि सत्ता आली की बदल करायचा, ही सरकारची कार्यपद्धती आहे. नव्या पिढीचे चारित्र्य तयार करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श नाही. तरीही युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांच्या अभ्यासातून काढून टाकणे ही कृती गंभीर असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही वाकुयद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कुस्ती ही बरोबरीच्या पैलवानाशी केली जाते, लहान मुलांशी नाही, असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. त्यामुळे आता येत्या २४ तारखेला काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.