Maharashtra Weather: राज्यातील काही भागातील गारठा कमी झाला आहे. तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं ऐन थंडीत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळं या भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान बदलांमुळं महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे.
दक्षिण केरळजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रसपाटीपासून 3.1 किमी उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळं याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानवर दिसून येत आहे. या स्थितीमुळं चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी -जास्त होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर होत आहे.
उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडीमध्ये चढ-उतार होत असून, काही भागात दाट धुके कायम आहे. राज्यातील किमान तापमानातही काही अंशी घट- वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणाचा देखील थंडीवर परिणाम होत आहे. काही भागात सकाळी धुके दिसते मात्र ढगाळ वातावरणामुळं थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जाणवते. राज्यातील तापमानातील चढ-उतार पुढील काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम थंडीवर असण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रुझचा पारा पुढील आठवडाभर 35 अंशांच्या कमाल पातळीवर राहणार आहे, तर किमान तापमान 20 अंशांच्या पुढे नोंद होणार आहे.