पुणे - पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सावत्र आई आणि वडिलांनी दोन चिमुरड्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शाळकरी मुलांना घरातील कामे सांगून ती केली नाही तर सळई आणि लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली जात होती. एका सजग नागरिकामुळे पोलिसांनी तपास करून आई आणि वडील दोघांना अटक केली.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या मुलांवर सावत्र आई आणि वडिलांकडून अत्याचार करण्यात येत आहेत. मुलांनी भीतीपोटी कोणाला याबद्दल माहिती दिली नाही. शेवटी अत्याचाराला कंटाळून ते लातूरला आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते. त्यावेळी एका सजन नागरिकामुळे ही घटना उघडकीस आली. आई आपल्याला लोखंडी सळईने मारते. वडीलही मारहाण करतात. आम्हाला चटके देण्यात येतात, असे अत्याचारग्रस्त मुलांनी कॅमेऱ्यापुढे सांगितले. आमच्याकडून घरातील सर्व कामे करून घेतली जात होती. ती केली नाही तर आम्हाला अमानुषपणे मारहाण केली जायची, असे या मुलांनी सांगितले. हा प्रकार समजल्यावर भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि त्यानंतर दोन्ही पालकांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.