Tesla Driver Using VR Headset: ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवं तंत्रज्ञान येत असून, रोज नवे बदल दिसत आहेत. जगभरातील कंपन्या या स्पर्धेत असून आपली कार अत्याधुनिक असावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कारमधील प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा यासाठी जगभरातील कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फिचर्सवर काम करत आहे. पण यामधून सुरक्षेचा धोकाही निर्माण होत आहे. दरम्यान, नुकतंच अमेरिकेतील रस्त्यांवर असं काही दिसलं आहे ज्यामुळे अमेरिकन सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चालक आपल्या डोळ्यांवर Apple VR Headset घातला असून, टेस्लाचा सायबर ट्रक चालवताना दिसत आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, चालक टेस्लाची नवा सायबर ट्रक चालवत आहे. यावेळी त्याने डोळ्यांवर Apple चा व्हीआर हेडसेट (Virtual Reality Headset) दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा हात स्टिअरिंग व्हिलवर नाही. याउलट तो हातानेच इशारे करत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. युजर्स रस्त्यावरुन जाणारी इतर वाहनं आणि पादचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त करत आहेत.
याप्रकरणी अमेरिकन सरकारचे वाहतूक विभागाचे सचिव पीट बटिगिएग (Pete Buttigieg) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, वाहन चालवताना चालकांनी प्रत्येक क्षणी लक्ष ठेवलं पाहिजे. "लक्षात ठेवा की, आज उपलब्ध सर्व अत्याधुनिक ड्रायव्हर असिस्ट सिस्टमसाठी आवश्यक आहे की, कार चालवताना प्रत्येक वेळी चालक नियंत्रणात असावा आणि त्याचं संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवर असावं".
Reminder—ALL advanced driver assistance systems available today require the human driver to be in control and fully engaged in the driving task at all times. pic.twitter.com/OpPy36mOgC
— Secretary Pete Buttigieg (@SecretaryPete) February 5, 2024
पीट बटिगिएग यांनी म्हटलं आहे की, कार कंपन्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या ऑटोपायलट, अॅडव्हान्स ऑटोपायलट किंवा सेल्फ ड्राइविंग व्हेईकल अशा नावांवर जाऊ नका. याचा अर्थ वाहनं स्वत:हून सुरक्षितपणे धावतील असं नाही. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी वाहनाचं नियंत्रण दरवेळी चालकाच्या हातात असायला हवं.
गेल्याच आठवड्यात Apple Vision Pro लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये बाहेरील जगातील दृश्यासह थ्री-डायमेंशनल डिजिटल कंटेंटला ब्लेंड करत व्हीआर हेडसेटच्या माध्यमातून प्रदर्शित केलं जातं. पण हा हेडसेट वाहन चालवताना वापरणं धोकादायक ठरु शकतं. असेच काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये कारचालक व्हीआर हेडसेट घालून कार चालवताना दिसत आहेत.