सावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर

डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...

Updated: Nov 29, 2017, 11:38 PM IST
सावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर  title=

दीपाली जगताप-पाटील, मुंबई : डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच स्मार्ट फोनशिवाय एकही दिवस राहू शकत नाही. पण याच स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 100% नव्हे तर तब्बल 400% वाढलीय. असा अहवाल  आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांनी दिलाय.

स्मार्टफोन आरोग्यासाठी जीवघेणा

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला स्मार्ट फोन. बॅंकींगपासून रेल्वेची तिकीटं काढण्यापर्यंत आणि शिळोप्याच्या गप्पांपासून ते लग्न जमवण्यापर्यंत सगळीच कामं आपला हा स्मार्ट फोन करतोय. मात्र असा हा आखूड शिंगी, बहुगुणी स्मार्ट फोन आरोग्याला हानीकारक असल्याचं आपण कुठेकुठे वाचतो. पण तो केवळ हानीकारकच नव्हे, तर जीवघेणा आहे.

स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका 400 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी याबाबत अहवाल केंद्र सरकारला दिलाय... तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय. 

अतिरिक्त वापर दुर्लक्षित करू नका

स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर दुर्लक्षित करू नका. त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याच्या शक्यतेत 400 टक्क्यांनी वाढ झालीये. स्मार्ट फोनमधून बाहेर पडणाऱ्या फ्री रे़डीकल्समुळे मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पुरूषांच्या जननक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो. दिवसाला अर्ध्या तासाहून अधिक काळ स्मार्ट फोन वापरल्यास ते धोकादायक ठरू शकतं. 

 मानवी डीएनएसाठी हे रेडिएशन घातक 

लहान मुलांची कवटी नाजूक असल्याने स्मार्ट फोनच्या रेडीएशनचा मोठा धोका त्यांना संभवतो. या रेडीएशनचा परिणाम प्राणी आणि वनस्पतींवरही होतोय. मानवी डीएनएसाठी हे रेडिएशन घातक असून त्यामुळे निद्रानाश, पार्कींन्सन, अल्झायमर या आजारांचीही शक्यता बळावते. 

 धोक्याचा आपण विचार करावा

सोशल मीडिया, गेम्स, सिनेमा, गाणी या सगळ्याचा आनंद आपण स्मार्ट फोनच्या माध्यमातून घेतोय. अगदी सगळे व्यवहारही आपले ऑनलाईन झाले आहेत. मात्र स्मार्ट फोनच्या या भडीमारातून होत असलेल्या धोक्याचा आपण विचारच करताना दिसत नाही. 

स्मार्ट फोन वापरू नका असा सल्ला पालकांकडून, तज्ज्ञांकडून येत असला तरी दररोजची कामं स्मार्ट फोनशिवाय करता येणं शक्य आहे का याचाही विचार व्हायला हवा यात शंकाच नाही. मात्र त्यासाठी आपण स्वतःवर काही बंधनं नक्की घालू शकतो. 

सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करा

स्मार्ट फोनचा वापर किती वेळ आणि कसा करावा याचं नियोजन करता येणं शक्य आहे. जिथे स्मार्ट फोन वापरण्याची गरज नाही तिथे तो टाळावा. रोज थोडाफार व्यायाम करावा. सोशल मीडियाचा वापर नियंत्रीत करावा, लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन अजिबात देऊ नये. शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्ट फोनपासून परावृत्त करावं, पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्ट फोनचा वापर टाळावा. 

स्मार्ट फोन ही बदलत्या युगाची ओळख निश्चितच आहे. या स्मार्ट फोनमुळे अनेक व्यवहार, अनेक कामं एका क्लिकसरशी होतही आहेत. पण तज्ज्ञांनी दिलेल्या धोक्याचा इशाराही दुर्लक्षून चालणार नाही. शेवटी स्मार्टफोनप्रमाणेच आपलं आरोग्यही आपल्याच हाती.