'मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..'; लोकांचा संताप

Narayana Murthy Ask Your Infosys Team To...: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली असतानाच एकाने थेट नारायण मूर्तींनाच सल्ला दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 18, 2024, 11:02 AM IST
'मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..'; लोकांचा संताप title=
सोशल मीडियावरुन दिला सल्ला

Narayana Murthy Ask Your Infosys Team To...: आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे त्याप्रमाणे अनेकांची शेवटच्या क्षणी परतावा भरण्यासाठी धावपळ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच बंगळुरुमधील एका चार्टड अकाऊंटला आयकर परतावा भरताना आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आयकर विभागाच्या परताव्यासंदर्भातील सेवांना तांत्रिक सपोर्ट इन्फोसिसकडून दिला जातो. त्यामुळेच अनेकजण आता नारायण मूर्तींनी स्थापन केलेल्या या कंपनीवरच आपला राग व्यक्त करत आहेत.

काय म्हणाले होते मूर्ती?

सोशल मीडियावर अनेकांनी स्क्रीनशॉट पोस्ट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिलेली असतानाच एक्सवरील एका युझरने थेट नारायण मुर्तींच्या विधानावरुन खोचक टोला इन्फोसिसला लगावला आहे. नारायण मूर्ती यांनी मागील वर्षी एका मुलाखतीमध्ये तरुण कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान 70 तास काम करुन देशाच्या उभारणीसाठी हातभार लावावा असा सल्ला दिला होता.

नेमकं काय म्हटलं आहे या व्यक्तीने?

आता याच सल्ल्यावरुन आयकर भरताना इन्फोसिस सपोर्ट करत असलेलं इन्कम टॅक्स पोर्टल चालत नसल्याने सीए असलेल्या बासू यांनी, "नारायण मूर्ती सर, तुमच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही टॅक्स प्रोफेश्नल आठवड्यातून 70 तासांहून अधिक काम करतोय. तुमच्या इन्फोसिसच्या टीमला इन्कम टॅक्स पोर्टल सुरळीत चालावं म्हणून, आठवड्यातून किमान एक तास तरी काम करायला सांगा," असा टोला लगावला आहे. तसेच या पोस्टच्या शेवटी, "अगाऊमध्ये तुमचे आभार" असंही म्हटलं आहे.

अनेकांनी केली साईट क्रॅशची तक्रार

केवळ बासूच नाही अनेकांनी अशापद्धतीचे स्क्रीनशॉट शेअर करत आयकर भरण्यासाठीचे साईट चालत नसल्याची तक्रार केली आहे. दरवर्षी अशाप्रकारे इन्फोसिसकडून टेक्निकल सपोर्ट देणाऱ्या आयकर परताव्याची साईट क्रॅश होत असल्याचा करदात्यांचा अनुभव आहे. हा वाद त्रास एवढा आहे की एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #IncomeTaxSiteIssues #IncomeTaxportal हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे.

आयकर परताव्याची शेवटची तारीख

आयकर परतावा भरण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै आहे. दरम्यान आतापर्यंतच्या आयकर परताव्यामध्ये वैयक्तिक आयकराच्या आकडेवारीने कॉर्परेट म्हणजेच कंपन्यांच्या आयकराच्या रक्कमेला मागे टाकल्याची बातमी समोर आली आहे. आयकर परतावा मोठा भूर्दंड पडू शकतो.