मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. जसं चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसतं, तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट सत्येच असते असं नाही. आग आणि पाणी म्हणजे अगदी विरोधाभास. पाण्यामुळे आग विझवण्यात येते. पण पाण्याला आग लागल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. पण सोशल मीडियावर समुद्रातल्या आगीचा एक व्हीडिओ वेगानं व्हायरल होतोय. ही आग नेमकी कुठे लागलीय? या व्हीडिओमागील मागचं सत्य काय, हे आपण जाणून घेऊयात. (Fact Check What is the truth behind the video of the sea fire)
व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय ?
समुद्रात पेटलेला धगधगता अग्नीकुंडच. समुद्रातलं आगीचं हे रौद्ररूप पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा येईल. आग विझवणं हा पाण्याचा गुणधर्म. पण इथे तर पाणीच पेटलंय. मेक्सिकोतल्या समुद्रातील आगीचा हा व्हीडिओ अतिशय वेगानं सोशल मीडियात व्हायरल होतोय. प्रत्येकाला एकच प्रश्न पडलाय समुद्रात आगीचा महाकाय गोळा आला कुठून ?
झी 24 तासनं या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मेक्सिकोतला असल्यानं तिथल्या सरकारी यंत्रणांच्या साईटस तपासून पाहिल्या तेव्हा काय सत्य समोर आलं.
व्हीडिओ मागचं सत्य
समुद्रातल्या पाण्याला लागलेली आगीची घटना खरी आहे. मेक्सिकोच्या युकाटन जवळ शुक्रवारी समुद्राच्या पाण्यावर अशी धगधगती आग दिसून आली. आगीमुळे इथल्या आकाशात धुराचे लोट पसरले होते. अंडरवॉटर पाईपलाईनमुळे ही आग लागली होती. समुद्रातून गॅसची पाईपलाईन टाकण्यात आलीय ती लिक झाल्यानं पाण्यावर आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या.
अशा प्रकारे गॅस पाईपलाईन लिक होऊन समुद्रात आग लागण्याची मेक्सिकोतील ही दुसरी घटना आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. अर्थात यामागे कोणताही चमत्कार किंवा निसर्गाचा रौद्रवतार नाही. ही एक दुर्घटना असून त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.