'रोहित शर्माची 5 शतकं हुकली, तो सर्वात...', SA विरोधातील सामन्यानंतर शोएब अख्तरने स्पष्टच सांगितलं

दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा मैदानात असता तर तबरेज शामसीला 20 षटकार ठोकले असते असं त्याने म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 6, 2023, 03:25 PM IST
'रोहित शर्माची 5 शतकं हुकली, तो सर्वात...', SA विरोधातील सामन्यानंतर शोएब अख्तरने स्पष्टच सांगितलं title=

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने वर्ल्डकपमधील आपल्या सलग 8 व्या विजयाची नोंद केली आहे. भारताने श्रीलंकेचा मोठा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेलाही तब्बल 243 धावांनी धूळ चारली. या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रोहित शर्माने किमान आपली 5 शतकं हुकवली आहेत अशी खंत व्यक्त करताना शोएब अख्तरने त्याला थोडा संयमाने खेळण्याचा सल्ला दिला आहे. तसंच जर रोहित शर्मा मैदानात असता तर तबरेज शामसीला 20 षटकार ठोकले असते असंही त्याने म्हटलं आहे. 

भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर शोएब अख्तरने 'झी न्यूज'शी संवाद साधताना म्हटलं की, "रोहित शर्माकडे प्रत्येक शॉट आहे. जर तबरेजने रोहित शर्माला अशी गोलंदाजी केली असती तर त्याने किमान 15 ते 20 षटकार ठोकले असते. जर रोहित शर्मा लवकर आऊट झाला नसता तर भारताची धावसंख्या 430 पेक्षा अधिक असती".

"मला हेच सांगायचं आहे की, रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्ये किमान 5 शतकं ठोकू शकला नसता. पण तो करु शकला नाही हे थोडं दुर्दैवी आहे. तो कर्णधार आहे हे मी समजू शकतो. पण त्याची आक्रमक खेळी विराट कोहली आणि पुढील फलंदाजांसाठी एक भक्कम पाया उभा करते. त्यामुळे त्यांच्यावर स्ट्राइक रेटचा दबाव येत नाही. पण तो लवकर शतक ठोकेल अशी मला आशा आहे," असं शोएब अख्तर म्हणाला आहे.

रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्ये संघाचं नेतृत्व करताना फलंदाज म्हणूनही जबरदस्त कामगिरी करत आहे. रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून देत आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानविरोधात त्याने सर्वाधिक 131 धावा केल्या आहेत. तसंच दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात त्याने 24 चेंडूत 40 धावा केल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने विराट कोहलीच्या 49व्या एकदिवसीय शतकाच्या जोरावर 5 गडी गमावून 326 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह मौल्यवान 77 धावांचं योगदान दिले. त्यानंतर रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्याने भारताने दक्षिण आफ्रिकेला 27.1 षटकांत केवळ 83 धावांत गुंडाळले. 

गेल्या आठवड्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत भारत उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेवर त्यांच्या विजयासह, भारताने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्धच्या त्यांच्या आगामी सामन्याच्या निकालाची पर्वा न करता गुणतालिकेत अव्वल स्थानावर दावा केला.