'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान

वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2023, 12:57 PM IST
'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान title=

एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा घोषणा झाल्यानंतर फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी न देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण अखेरच्या क्षणी आर अश्विनच्या नावाची घोषणा झाली तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोक्याच्या क्षणी भारतीय संघाता स्थान मिळालेला अक्षर पटेल जखमी झाला आणि दुखापतीतून सावरला नाही. यामुळे दुर्दैवाने त्याला संघाबाहेर बसावं लागलं आणि त्याच्या जागी आर अश्विनला संघाचं तिकीट मिळालं. दरम्यान आर अश्विनने आशिया कपमधील आपल्या खेळीने आपण यासाठी पात्र असल्याचं सिद्ध केलं होतं. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली होती. दरम्यान संघात निवड होण्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह झालेल्या संभाषणाचा आर अश्विनने खुलासा केला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याने ही माहिती दिली. 

अक्षर पटेल जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. पण अखेर आर अश्विनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यासंबंधी खुलासा करताना आऱ अश्विनने सांगितलं की, राहुल द्रविड आणि रोहित शर्माने आधीच आपल्याला या स्थितीची कल्पना दिली होती. गरज लागल्यास आम्ही परत तुझ्याकडे येऊ असं ते म्हणाले होते. पण यावेळी आर अश्विनने त्याला उपहासात्मकपणे, तुम्ही परत येणार नाही अशी आशा असं म्हटलं होतं. 

"मी घऱात आराम करत होतो. काही क्लब गेम्स खेळलो होतो. पण रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी मला जर गरज भासली तर पुन्हा तुझ्याकडे परत येऊ असं सांगितलं होतं. पण मी त्यांना मस्करी करत तुम्ही परत येणार नाही अशी आशा असल्याचं म्हटलं होतं," असा खुलासा आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरोधातील विजयानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केला.

"मी चेन्नईत फार क्रिकेट खेळलो आहे. चेन्नईची खेळपट्टी नेहमीप्रमाणे नव्हती. त्याच्यावर फार भेगा होत्या. तुम्ही हेजलवूड आणि इतर गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये कशी गोलंदाजी केली ते पाहिलंत. खरं तर सामन्यात काय स्थिती असेल याबद्दल आम्हाला थोडी चिंता होती. येथील प्रेक्षक नेहमीच आमच्या पाठीशी असतात. सुदैवाने आम्ही टॉस हारलो आणि जेव्हा जाडेजा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने जबरदस्त कामगिरी केली," असं आर अश्विनने म्हटलं.

"एखाद्या ठराविक वेगात गोलंदाजी करणं हे गोलंदाजांसाठी कठीण असतं. खरं आव्हान हे चेंडू साईड स्पीन आणि ओव्हरस्पीन योग्य टाकण्याचा असतो. माझ्यासाठी 6 ते 8 चेंडू व्यवस्थित टाकणं महत्त्वाचं असतं," असं आर अश्विनने सांगितलं आहे.