...तर अफगाणिस्तान पाकिस्तानला हारवेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीही सोडली संघाची साथ

World Cup Pakistan Vs Afghanistan: पाकिस्तानचा संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळला असून त्यापैकी 2 सामन्यामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 22, 2023, 02:41 PM IST
...तर अफगाणिस्तान पाकिस्तानला हारवेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीही सोडली संघाची साथ title=
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान 23 ऑक्टोबर रोजी सामना खेळवला जाणार

World Cup Pakistan Vs Afghanistan: वर्ल्ड कप 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघासमोरील संकटं दिवसोंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. नेदरलॅण्ड्स आणि श्रीलंकेविरुद्धचे आपले पाहिले 2 सामने जिंकून स्पर्धेला जोरदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानची गाडी रुळावरुन उतरल्याचं दिसत आहे. पहिले 2 सामने जिंकल्यानंतर पुढील 2 सामन्यामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. आधी भारतीय संघाने 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलं. नंतर 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पाणी पाजलं. मोठ्या फरकाने पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्यांच्या नेट रन रेटलाही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानी आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या उरलेल्या सामन्यांपैकी 3 सामने जिंकणे बंधनकारक आहे. 

पाकिस्तानी चाहते संतापले

बाबर आझमच्या या संघाच्या कामगिरीवर पाकिस्तानमधूनही टीका होताना दिसत आहे. पाकिस्ताचे माजी क्रिकेटपटू तसेच पाकिस्तानी चाहते संघावर नाराज आहेत. आपले आवडते खेळाडू मैदानामध्ये ऐन वेळी कच खात असल्याचं पाहून चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकी जात असल्याचं चित्र दिसत आहे. पाकिस्तानचा संघ मनापासून खेळत नसल्याची टीकाही पाकिस्तानी चाहते करत आहेत. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी तर बॉलिंग आणि बॅटिंगबरोबरच पाकिस्तानी संघ फिल्डींगमध्येही फारच सुमार कामगिरी करत असून हा संघ सेमीफायनलासाठी योग्य नाही असंही म्हटलं आहे. 

पाकिस्तानचा पुढचा सामना कठीण

पाकिस्तानी संघाचा पुढील सामना सोमवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईतील मैदानात खेळवला जाणार आहे. ऑन पेपर पाहिल्यास पाकिस्तानी संघ हा अफगाणिस्तानपेक्षा अधिक संतुलित वाटतो. अनुभवाच्या दृष्टीनेही पाकिस्तानी संघातील खेळाडूंची आकडेवारी ही अफगाणी खेळाडूंपेक्षा सरस ठरते. असं असलं तरी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांचं मत अगदीच वेगळं आहे. 

अफगाणिस्तानचा संघ फेव्हरेट

पीसीबीच्या माजी अध्यक्षांनी आणि सध्या कॉमेंटेटर म्हणून कार्यरत असलेल्या रमीझ राजा यांनी चेपॉकच्या मैदानामधील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असल्याचं नमूद केलं आहे. फिरकी गोलंदाजांना ही खेळपट्टी मदत करणारी असल्याने हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा संघ हा फेव्हरेट मानला जात आहे.

पाकिस्तानची कठोर परीक्षा...

रमीझ राजा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर, "पाकिस्तानी संघाचा वर्ल्ड कप 2023 मधील फिरकी गोलंदाजांसमोरील रेकॉर्ड फारच वाईट आहे. आता पाकिस्तानचे फलंदाज फिरकी गोलंदाजी सहज खेळून काढू शकत नाही. पाकिस्तानी संघाच्या पुढील सामन्याच्या मैदानावरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदायची मानली जाते. त्यामुळेच राशीद खानच्या नेतृत्वाखाली फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अफगाणि गोलंदाजांना खेळून काढणं पाकिस्तानी फलंदाजांसाठी सहज शक्य होईल असं दिसत नाही," अशी शक्यता व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांचा ताफा हा अफगाणिस्तानकडे आहे. अफगाणिस्तान हा सध्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असलेला संघ आहे असंही रमीझ राजा यांनी म्हटलं आहे. हे गोलंदाज चेन्नईमध्ये पाकिस्तानची कठोर परीक्षा घेणार आहेत, असं भाकित रमीझ राजा यांनी केलं आहे.

...तर अफगाणिस्तान सरस

"पाकिस्तानला परिस्थिती आपल्या बाजूने करुन घेणं फार कठीण जाणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात काहीही होऊ शकतं. जर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणार असेल तर अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकण्यासाठी फेव्हरेट असेल. अफगाणिस्तानचा संघ फिरकी गोलंदाजांचा पाठिंबा देणाऱ्या खेळपट्टीवर पाकिस्तानपेक्षा नक्कीच सरस आहे," असं रमीझ राजा म्हणाले. 

पाकिस्तानची पुढील वाटचाल कशी?

अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानच्या संघाचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्यापुढील सामना 31 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध आणि 4 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानी संघ मैदानात उतरेल. पाकिस्तानचा साखळी फेरीतील सामना 11 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पुढील 5 सामन्यांपैकी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध सहज जिंकू शकतो असं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला अधिक प्रयत्न करावे लागतील असं म्हटलं जात आहे.