Manoj Jarange on Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट (Narco Test) करावी अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही अटक करावी असंही म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मनोज जरांगे यांच्यासह देशमुखांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. या मोर्चाआधी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"आरोपी फरार असले तरी सरककारला त्यांना पकडावं लागणार आहे. एक काम मुख्यमंत्र्यांकडून होण्याचं गरजेचं आहे ते म्हणजे सर्व आरोपींची नार्को चाचणी केली पाहिजे. ती सरकारने करायलाच पाहिजे. खंडणीतील गुन्ह्यातील आरोपींचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. सरकारने कसलीही हयगय करु नये. यामागे मोठं रॅकेट आहे. पुण्यातूनच सगळ्यांना अटक केली जात असेल तर सरकार किंवा सरकारमधील कोणत्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय पाठबळ आहे, त्यामुळे नार्को टेस्ट गरजेची आहे. यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं याची माहिती सरकारने काढावी," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
"एका बांधवाची क्रूरपणे हत्या झाली आणि आरोपांना सांभाळण्यात मोठेपण वाटणारे हे नेमके कोण आहेत? आरोपींना भाकरी खावू घालावी, त्यांना ऐशोआरामाचं जीवन द्यावंसं वाटतं हे कोण आहेत? सरकाराने त्यांना मागे ठेवू नये. नार्को टेस्ट झाल्यास यामध्ये 100 टक्के सरकारचे कोणते मंत्री, आमदार आहेत हे समोर येईल," असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, "सरकारमधील मंत्री याला खतपाणी घालत आहेत. सामूहिक कट शिजवला जात आहे. कसं लपायचं, कसं पळायचं. इतक्या दिवसांनी अटक हो, पुण्यात हो असं सांगितलं असावं. आता पुण्याचंही नाव बदनाम करायचा प्रयत्न आहे".
हे प्रकरण थंड व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "यांच्या बापाचा बाप आला तरी प्रकरण थंड होऊ देणार नाही, दबू देणार नाही. तुम्ही लपताय ना मग आता बघा. सीआयडी, पोलीस प्रशासन, एसआयटी जे चौकशी करत आहेत यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. पुढे असे खून कऱणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत, त्यासाठी ज्यांना मदत केली त्यांना कडक शिक्षा करा. लपवून ठेवलं म्हणजे तेदेखील षडयंत्रात सहभागी होते. यांनी ज्यांच्या गाड्या वापरल्या तेदेखील जबाबदार आहेत, एखाद्याचं लेकरु गेलं याचं दु:खच नाही. यांना धडा शिकवणं गरजेचं आहे".
आरोपींचा आकडा 50 ते 60 वर जाऊ शकतो असाही दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. हत्या खंडणीमुळे झाली. खंडणी मागणारा मुख्य असून, खून करायला सांगण्यात आलं. फोन रेकॉर्डही आता पोलिसाकडे आले असतील. खंडणी मागणारे आण हत्या करणारे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे.