'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार?

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता.   

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2023, 11:51 AM IST
'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार? title=

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार असल्याने हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाची वर्ल्डकपचा षटकार लगावण्याची इच्छा असेल. भारत संघ या वर्ल्डकपमध्ये अजय राहिला असल्याने मजबूत स्थितीत आहे. सेमी-फायनलमध्ये न्यूझीलंड संघाचा 70 धावांनी पराभव करत भारताने आपल्या सलग 10 व्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. 

फायनलआधी क्रिकेटतज्ज्ञ तसंच माजी खेळाडूंकडूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. आतापर्यंत दोन्ही संघाने केलेली खेळी पाहता अंदाज मांडले जात आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श याने केलेली एक भविष्यवाणी व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि भारतीय संघाला त्यांच्यात मायदेशात पराभूत करेल असं त्याने म्हटलं होतं. 

मिशेल मार्श याने भविष्यवाणी वर्तवताना म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावत 450 धावा करेल. यानंतर भारत संघ फक्त 65 धावांवर सर्वबाद होऊन पराभूत होईल. ऑस्ट्रेलिया संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर मिशेल मार्शची ही भविष्यवाणी व्हायरल होत आहे. 

"ऑस्ट्रेलिया अजय राहिल आणि भारताला पराभूत करेल. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात 2 विकेट गमावत 450 धावा करेल. भारत संघ 65 धावांवर सर्वबाद होईल," असं मार्शने मे 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. 

भारतीय संघ 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकू शकलेला नाही. यामुळे हा वर्ल्डकप जिंकत भारत हा दुष्काळ संपवेल अशी चाहत्यांना आशा आहे. दरम्यान भारतासाठी फायनलचा प्रवास फार सोपा नसेल. भारतासमोर ऑस्ट्रेलिया संघाचं तगडं आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया संघाने सलग 8 सामने जिंकत फायनल गाठली आहे. पण सध्याचा भारतीय संघ पाहता ऑस्ट्रेलियाला जास्त चिंता असेल. याआधी ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला होता. भारताने ऑस्ट्रेलिया संघाला फक्त 199 धावांवर सर्वबाद केलं होतं.