World Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून...

No Need For World Cup 2023 Final Match: नियोजित वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2023, 10:37 AM IST
World Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून... title=
सेमीफालयनसमधील चौथा संघही जवळपास निश्चित झाला आहे

No Need For World Cup 2023 Final Match: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील 41 व्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत सेमीफायलनमधील स्थान जवळपास निश्चित केल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये सेमीफायलन रंगणार आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना 5 विकेट्स अन् 26.4 ओव्हर राखून सहज जिंकत सेमीफायलनमधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध सेमीफायनल खेळणार असेल तर हा सामना मुंबईत होणार आहे. भारतीय संघाचा साखळीफेरीतील केवळ नेदरलॅण्डविरुद्धचा सामना शिल्लक असून तो 12 तारखेला खेळवला जाणार आहे. मात्र स्पर्धा संपण्यासाठी 7 सामने शिल्लक असतानाच एका माजी क्रिकेटपटूने वर्ल्ड कपचा अंतिम सामनाच खेळवू नये असं म्हटलं आहे.

फायलन रद्द करण्याची मागणी

भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये भन्नाट कामगिरी करत आहे. अनेकांना भारतीय संघाची कामगिरी पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताने साखळी फेरीतील आपले 9 पैकी 8 सामने जिंकले असून शेवटचा सामनाही भारत जिंकेल असं मानलं जात आहे. भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतच यंदा वर्ल्ड कप जिंकणार असं भाकित व्यक्त केलं आहे. भारताने वर्ल्ड कपमधील आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला. पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारताचा सामना अटीतटीचा होईल असं वाटत होतं. मात्र भारताने दिलेल्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 83 धावांवर तंबूत परतला. भारताने सामना 243 धावांनी जिंकला. हीच कामगिरी पाहून आता वर्ल्ड कपची फायलन रद्द करण्याची मागणी एका क्रिकेटपटूने केली आहे.

अंतिम सामन्याची गरज नाही

सरासरी 300 ते 325 धावा करुन प्रतिस्पर्धांना पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने ज्या पद्धतीने पराभूत केलं ते पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने एक पोस्ट केली आहे. एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन हॉगने केलेल्या पोस्टमध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी केलेल्या पोस्टमध्ये हॉगने, 'काल रात्रीच्या सामन्यानंतर (वर्ल्ड कप स्पर्धेचा) फायलन सामना खेळवण्याची गरज वाटत नाही. स्पर्धा संपवण्यासाठी भारत विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड (इतर सर्व संघांतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ) असा सामना खेळवा. ते फारच कमाल खेळ करत आहेत,' असं म्हटलं आहे.

भारत ठरला सेमीफायलनमध्ये जाणारा पाहिला संघ

भारताने साखळी फेरीतील आपले 8 ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने जवळपास सर्वच सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला. सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंडचा संघ हा सेमीफायलनसाठी जवळपास निश्चित मानला जात आहे. तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ तांत्रिक दृष्ट्या सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडलेले नाहीत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी या दोन्ही संघांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करुन दाखवाव्या लागतील. 

वर्ल्ड कपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.