रोहित म्हणतो फक्त सूज, पण हार्दिक पांड्याचं भवितव्य अंधारात? BCCI ने दिली मोठी अपडेट

बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला असून जखमी झाला आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला चिंता सतावत असून, यादरम्यान बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2023, 02:06 PM IST
रोहित म्हणतो फक्त सूज, पण हार्दिक पांड्याचं भवितव्य अंधारात? BCCI ने दिली मोठी अपडेट title=

बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला असून जखमी झाला आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या धरमशाला येथे होणारा पुढील सामना गमावणार आहे. 22 ऑक्टोबरला भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात भिडडणार आहे. हार्दिक पांड्याला उपचारासाठी बंगळरु येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत नेलं जाणार आहे. तिथे इंग्लंडमधील विशेष डॉक्टर त्याच्यावर उपचार करण्याची शक्यता आहे. यावेळी कदाचित त्याला इंजेक्शनही दिलं जाऊ शकतं. हार्दिक पांड्या लखनऊमध्ये भारतीय संघात पुन्हा सामील होण्याची शक्यता आहे. येथे भारतीय संघ इग्लंडविरोधात खेळणार आहे. 

"हार्दिक पांड्या बंगळुरुला जाणार आहे. त्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमीत बोलावण्यात आलं आहे. वैद्यकीय पथकाने त्याचा स्कॅन रिपोर्ट पडताळला आहे. इंजेक्शन घेतल्यानतंर तो बरा होईल असं दिसत आहे. बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली असून त्यांचंही हेच मत आहे. पुढील सामन्यात हार्दिक खेळू शकणार नाही," असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

बीसीसीआयने सांगितलं आहे की, टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला बांगलादेशविरोधातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं होतं आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली असेल. 20 ऑक्टोबरला तो संघासोबत धर्मशालाला जाणार नाही. तो आता थेट लखनऊमध्ये टीममध्ये सामील होईल जिथे भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

नेमकं काय झालं होतं?

बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्या 9 वी ओव्हर टाकत असताना लिट्टन दासने टोलावलेला चेंडू आपल्या उजव्या पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तो घसरुन पडला. हार्दिक पांड्या आपल्या उजव्या पायावर खाली आदळला आणि घोट्याला दुखापत झाली. दुखापत झाल्याने हार्दिक पांड्या मैदानातच खाली बसला होता. हार्दिक पांड्याला प्रचंड वेदना होत असल्याने फिजिओने मैदानात धाव घेतली. 

हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात खेळण्यासाठी उभा राहील असं वाटलं होतं. पण हार्दिक पांड्याला व्यवस्थित पळण्यास जमत नव्हतं. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला मैदानातून बाहेर बोलावलं. दरम्यान हार्दिक पांड्याची ओव्हर पूर्ण झाली नसल्याने उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी विराट कोहलीला बोलावण्यात आलं. यानिमित्ताने विराट कोहलीने तब्बल 6 वर्षांनी गोलंदाजी केली. 

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर बोलताना रोहित शर्माने सांगितलं होतं की, "त्याला थोडी दुखापत झाली आहे. पण दुखापत जास्त गंभीर नाही ही दिलासा देणारी बाब आहे. पण अशी दुखापत असेल तर तुम्हाला रोज आढावा घेण्याची गरज असून, आम्ही गरज असणारी प्रत्येक गोष्ट करत आहोत. न्यूझीलंडविरोधातील सामना मोठा असणार आहे. संघातील प्रत्येकाला दडपणाखाली खेळण्याची सवय आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आमच्यासाठी ही विशेष बाब आहे. प्रेक्षकांना आम्ही नाराज केलेलं नाही आणि यापुढेही मोठी कामगिरी करु अशी अपेक्षा आहे".