'मला वाटतं दिल दिल पाकिस्तान....', अफगाणिस्तानकडून लाजिरवाण्या पराभावनंतर इंग्लंडच्या खेळाडूने उडवली खिल्ली

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाला ट्रोल केलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 24, 2023, 01:43 PM IST
'मला वाटतं दिल दिल पाकिस्तान....', अफगाणिस्तानकडून लाजिरवाण्या पराभावनंतर इंग्लंडच्या खेळाडूने उडवली खिल्ली title=

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आणखी एका अनपेक्षित निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला आहे. पाकिस्तान संघाने दिलेलं 284 धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत सहजपणे गाठलं. अफगाणिस्तानच्या तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावत पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. गोलंदाजी पाकिस्तान संघाची जमेची बाजू असतानाही अफगाणिस्तानच्या फलंदाजांची विकेट काढताना त्यांना घाम फुटला होता. दरम्यान, या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जबरदस्त टीका होत आहे. टीका करणाऱ्यांमध्ये इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनदेखील आहे. यावेळी त्याने 'दिल दिल पाकिस्तान' गाण्याचा उल्लेख करत त्यांना टोला लगावला. 

पाकिस्तानी क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी भारताविरोधातील पराभवानंतर 'दिल दिल पाकिस्तान' गाण्याचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तान संघाचं थीम असणारं 'दिल दिल पाकिस्तान' गाणं न वाजवल्याने आमचा पराभव झाल्याचं म्हटलं होतं. याचाच आधार घेत मायकल वॉनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. 

'आज चेन्नईत दिल दिल पाकिस्तान वाजवलं गेलं नाही वाटतं,' अशी पोस्ट मायकल वॉनने एक्सवर शेअर केली आहे. 

मिकी आर्थर काय म्हणाले होते?

"हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले होते. 

बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरने 72 धावांची खेळी केली. अबदुल्ला शफीकच्या 58 धावा, शादाब खानच्या 40 धावा आणि इफ्तिकार अहमदच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 282 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या रेहमनुतुल्ला गुरबाझने 65 धावा आणि इब्राहिम झार्दानने 87 धावा करत उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर रेहमत शाहने नाबाद 77 आणि हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 48 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने यानिमित्ताने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. याआधी 9 दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे.