कांदिवलीमधील आगीत IPL खेळाडूच्या बहिणीचा आणि भाच्याचा होरपळून मृत्यू, भारतभेट अखेरची ठरली

मुंबईतील कांदिवली येथे सोमवारी लागलेल्या भीषण आगीत एक महिला आणि तिच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाला भेटण्यासाठी ते स्कॉटलंड येथून मुंबईला आले होते. मृत महिला आणि मुलगा एका आयपीएल खेळाडूचे नातेवाईक होते.   

शिवराज यादव | Updated: Oct 24, 2023, 01:03 PM IST
कांदिवलीमधील आगीत IPL खेळाडूच्या बहिणीचा आणि भाच्याचा होरपळून मृत्यू, भारतभेट अखेरची ठरली title=

मुंबईतील कांदिवलीत सोमवारी एका रहिवासी इमारतीत लागलेल्या आगीत महिला आणि तिच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाला भेटण्यासाठी ते स्कॉटलंड येथून मुंबईला आले होते. ग्लोरी वल्थाती (45) आणि तिचा मुलगा जोशुओ रॉबर्ट (8) अशी त्यांची ओळख पटली आहे. ग्लोरी ही माजी क्रिकेटपटू पॉल वल्थातीची बहिण आहे. पॉल वल्थाती आयीएलमध्ये किंग्स पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. दरम्यान अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगीत होरपळून तिघे जखमी झाले आहेत. 

ग्लोरी स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास होती. आपल्या आजारी आई-वडिलांना भेटण्यासाठी ती मुलासह मुंबईत आली होती. कांदिवलीमधील आठ मजली वीना संतूर को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ते राहत होते. 

मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी रविंदा अंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात एफ विंगच्या पहिल्या माळ्यावरील एका दिव्यामुळे ही आग लागली आणि नंतर पसरली असल्याचं दिसत आहे. "एका फ्लॅटमध्ये जळता दिवा ठेवण्यात आला होता. या दिव्यामुळेच आग लागल्याचं आणि नंतर इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंत पोहोचली आणि पसरली असं प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे," असं ते म्हणाले आहेत. इमारतीमध्ये आगनिरोधक यंत्रणा नसल्याचंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे. 

"पहिल्या माळ्यावरील फर्निचर जळाल्याने आगीमुळे झालेला धूर सहाव्या माळ्यापर्यंत पोहोचला होता. यानंतर आग वरपर्यंत पोहोचली आणि लोक अडकले," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. वल्थाती कुटुंब एफ विंगच्या चौथ्या मजल्यावर वास्तव्यास होतं. 

नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, ग्लोरीचे आई-वडील खूप आजारी असून अंथरुणाला खिळलेले आहेत. जेव्हा आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब फ्लॅटमध्ये होतं. पॉल आपली पत्नी, मुलं आणि ग्लोरीच्या मोठ्या मुलीसह खाली धावत आला होता. पण ग्लोरी आणि तिचा मुलगा त्यांच्या दोन घरातील मोलकरणीसंह पळून जाण्याच्या प्रयत्नात जिन्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. 

"ग्लोरीचा पती नोएल रॉबर्ट हा आजारी आई-वडिलांसह घरी थांबला होता. त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला मोलकरणींसह बाहेर जाण्यास सांगितलं. खरं तर त्यांनी वर गच्चीवर जाणं अपेक्षित होतं, पण ते खाली का गेले हे समजलं नाही," असं नातेवाईक ग्लॅडस्टोरन बेहरा यांनी सांगितलं आहे. 

घरातील मोलकरणी राजेश्वरी आणि लक्ष्मी जखमी झाल्या आहेत. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजेश्वरी 80 ते 90 टक्के जळाल्या आहेत, तर लक्ष्मी 50 ते 60 टक्के भाजली आहे. 

इमारतीमधील 75 वर्षीय रंजन शाहदेखील जखमी झाले आहेत. ते तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास होते. ते 40 ते 50 टक्के भाजले आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 तास लागले. सोसायटीचे सेक्रेटरी निलेश देसाई त्यांनी त्यांच्या  इमारतीच्या शेजारील जमिनीवरील अतिक्रमणामुळे अग्निशमन दलासाठी अडथळे निर्माण झाल्याचा ठपका ठेवला आहे. “त्यांनी आमच्या सोसायटीचे दुसरे गेट अडवले आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या,” असं ते म्हणाले आहेत.