वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार असून, संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या सामन्याकडे आहे. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना पार पडणार आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली. यासह भारताने 2015 मधील पराभवाचा वचपा काढला. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताकडे 2003 मधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता. आता भारत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत हा हिशोब चुकता करेल अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. यादरम्यान 2003 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीने जर संघाने आपली आतापर्यंतची कामगिरी कायम ठेवली तर सहजपणे जिंकतील असं म्हटलं आहे.
"भारतीय संघ या घडीला जबरदस्त स्थितीत दिसत आहे. अहमदाबादमधील सामन्यासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. भारताने या स्पर्धेत फार उत्तम खेळी केली असून आता त्यांच्यात आणि ट्रॉफीमध्ये फक्त एक सामना व ऑस्ट्रेलियाचा अडथळा आहे. जर भारताने आतापर्यंत या स्पर्धेत जशी खेळी केली आहे तशीच खेळी केली तर त्यांना थांबवणं फार कठीण आहे. ऑस्ट्रेलियादेखील चांगला संघ असल्याने हा अटीतटीचा सामना असेल," असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार असल्याने हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकीकडे भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाची वर्ल्डकपचा षटकार लगावण्याची इच्छा असेल. भारत संघ या वर्ल्डकपमध्ये अजय राहिला असल्याने मजबूत स्थितीत आहे. सेमी-फायनलमध्ये न्यूझीलंड संघाचा 70 धावांनी पराभव करत भारताने आपल्या सलग 10 व्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय संघ 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकू शकलेला नाही. यामुळे हा वर्ल्डकप जिंकत भारत हा दुष्काळ संपवेल अशी चाहत्यांना आशा आहे. दरम्यान भारतासाठी फायनलचा प्रवास फार सोपा नसेल. भारतासमोर ऑस्ट्रेलिया संघाचं तगडं आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया संघाने सलग 8 सामने जिंकत फायनल गाठली आहे. पण सध्याचा भारतीय संघ पाहता ऑस्ट्रेलियाला जास्त चिंता असेल. याआधी ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला होता. भारताने ऑस्ट्रेलिया संघाला फक्त 199 धावांवर सर्वबाद केलं होतं.