Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून राज्याच्या बहुतांश भागांपर्यंत... पाहा हवामानाचा अचूक अंदाज. कोणत्या भागात जारी करण्यात आलाय सावधगिरीचा इशारा? पाहा...   

सायली पाटील | Updated: Dec 27, 2024, 08:25 AM IST
Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?  title=
Maharashtra Weather News hailstorm rain predictions in Akola nashik orange alert issued

Maharashtra Weather News : काश्मीरचं खोरं आणि हिमाचल प्रदेशातील स्पितीचं खोरं वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या थंडी माघार घेताना दिसत आहे. उत्तरेकडील या राज्यांमध्येसुद्धा मैदानी क्षेत्रामध्ये तापमानाच काही अंशांची वाढ झाली आहे. पर्वतीय क्षेत्रांवर मात्र  शीतलहरींचा मारा कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. हवामानाच्या या स्थितीप्रमाणंच दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रावर कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम होत असल्यामुळं मध्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.

वादळी पावसासह गारपिटीचा इशारा 

मागील 24 तासांपासून महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान पाहायला मिळत असून सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर राज्यात, 27 डिसेंबर (शुक्रवारी) वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हीच परिस्थिती कायम राहणार असून, इथं धुरक्यामुळं दृश्यमानतेवर परिणाम होताना दिसणार आहे.

तर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे तर बाजार समितीत सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे तर साठवणुकीची व्यवस्था नसलेल्या बाजार समितीत उघड्यावर असलेला सोयाबीन सुद्धा भिजण्याची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा : 'इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल...' डॉ. मनमोहन सिंग अखेरच्या पत्रकार परिषदेत असं का म्हणाले होते?

 

नागपूर, वर्धासह पश्चिम विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, ऐन हिवाळ्यात हे पावसाळी दिवस पाहायला मिळत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र निवळत असून, परिणामी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थंडी पुन्हा एकदा राज्याची वाट धरेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.