प्रशिक्षक रमेश पोवारमुळे मानसिकता बदलली-हरमनप्रीत कौर

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला टीमनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Updated: Nov 22, 2018, 10:50 PM IST
प्रशिक्षक रमेश पोवारमुळे मानसिकता बदलली-हरमनप्रीत कौर title=

एंटिगा : यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला टीमनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला मिळालेल्या या यशाचं श्रेय हरमनप्रीत कौरनं प्रशिक्षक रमेश पोवारला दिलं आहे. रमेश पोवार टीमचा प्रशिक्षक झाल्यापासून आमची मानसिकता बदलली आहे, असं हरमनप्रीत कौर म्हणाली. या टी-२० वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारतानं सगळ्या ४ मॅच जिंकल्या.

रमेश पोवारला तुषार अरोठेंना वादग्रस्तरित्या काढून टाकण्यात आल्यानंतर प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. आमची रणनिती आणखी चांगली झाली आहे आणि लक्ष्यही मोठं झालं आहे. आमचा आत्मविश्वास वाढला आहे. या सगळ्याला रमेश पोवार जबाबदार आहे. रमेश पोवार आल्यानंतर आमची मानसिकता बदलली आहे, असं वक्तव्य हरमनप्रीतनं केलं.

रमेश पोवार या टी-२० वर्ल्ड कपपर्यंतच भारतीय टीमचा प्रशिक्षक असेल. यावर्षी ऑगस्टमध्ये रमेश पोवारची महिला टीमचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली. मागच्या दीड वर्षात पोवार महिला टीमचा तिसरा प्रशिक्षक आहे. अरोठेंच्या आधी या पदावर पूर्णिमा राव होती. पूर्णिमा रावला २०१७ सालच्या महिला वर्ल्ड कपच्या काही महिनेआधी पदावरून हटवण्यात आलं होतं.

रमेश पोवारनं भारताकडून २००४ ते २००७ दरम्यान ३१ वनडे आणि २ टेस्ट मॅच खेळल्या. रमेश पोवारनं वनडेमध्ये ३४ विकेट घेतल्या होत्या. पोवारनं नोव्हेंबर २०१५ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.