मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शुक्रवारी मेलबर्नमध्ये दुसरी टी-२० मॅच खेळवण्यात येईल. पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला होता. त्यामुळे ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया १-०नं आघाडीवर आहे. सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावी लागणार आहे. भारतानं आत्तापर्यंत लागोपाठ ७ टी-२० सीरिज जिंकल्या आहेत. पण ही मॅच गमावली तर भारताचं हे रेकॉर्डही तुटेल. भारत आणि ऑस्ट्रेलियातली दुसरी टी-२० भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता सुरु होईल.
ब्रिस्बेनच्या मैदानात भारताचा पराभव झाला असला तरी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी)वरचं रेकॉर्ड भारताच्या बाजूचं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या मैदानात आत्तापर्यंत ३ टी-२० मॅच झाल्या. यातल्या २ मॅच भारतानं जिंकल्या तर एकात पराभव पत्करावा लागला. २००८ साली पहिल्यांदा झालेली टी-२० ऑस्ट्रेलियानं ९ विकेटनं जिंकली होती. यानंतर २०१२ साली भारतानं ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनं आणि २०१६ साली २७ रननी हरवलं.
मेलबर्नच्या मैदानात सर्वाधिक टी-२० मॅच खेळण्याचं आणि रन बनवण्याचं रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या नावावर आहे. फिंचनं या मैदानात ८ मॅचमध्ये ५७.४० च्या सरासरीनं २८७ रन केले आहेत.
मेलबर्नच्या मैदानात रोहित शर्मा आणि धोनीनं आत्तापर्यंत ३-३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी रोहित जेव्हा मेलबर्नच्या मैदानात उतरेल तेव्हा तो या मेलबर्नमध्ये सर्वाधिक ४ टी-२० मॅच खेळणारा पहिला परदेशी खेळाडू बनेल.
या मॅचमध्ये रोहित शर्मानं ५८ रन केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरेल. सध्या रोहितच्या नावावर ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २२१४ रन आहेत. रोहितच्या पुढे न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील आहे. गप्टीलनं ७५ मॅचमध्ये २२७१ रन केले आहेत. गप्टील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.
एमसीजीवर एकूण ६ टीमनी टी-२० मॅच खेळल्या आहेत. यातल्या ऑस्ट्रेलियानं इकडे सर्वाधिक ११ मॅच खेळल्या, यातल्या ७ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. भारत आणि इंग्लंडनं या मैदानात ३-३ मॅच खेळल्या. भारतानं यातल्या २ मॅच जिंकल्या तर इंग्लंडला एकही मॅच जिंकता आली नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारताशिवाय श्रीलंकेनं या मैदानात २ मॅच जिंकल्या आहेत. इंग्लंडप्रमाणेच पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला या मैदानात एकही मॅच जिंकता आली नाही.
एमसीजी मैदानावर टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटनं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. टेटनं या मैदानात ३ मॅचमध्ये ६ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्याच नॅथन ब्रॅकननं या मैदानात २ टी-२० मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या. प्रवीण कुमार आणि रवींद्र जडेजानं एमसीजीवर ३-३ विकेट घेतल्या आहेत.