टीम इंडिया 5 वर्षांपूर्वीचा वचपा आज घेणार का?

भारताला या मैदानावर पाच वर्षांच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.

Updated: Nov 19, 2021, 02:40 PM IST
टीम इंडिया 5 वर्षांपूर्वीचा वचपा आज घेणार का? title=

रांची : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून रांचीच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताने पहिला T-20 सामना 5 विकेटने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा आजचा सामना भारताने जिंकला तर मालिका आपल्या नावावर होईल. 

रांचीच्या जेएससीए मैदानाचा इतिहास टीम इंडियाकडे आहे. आत्तापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आहेत आणि त्या दोन्हीमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे.

टीम इंडिया 5 वर्ष जुना बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार

या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंड आणि भारताचे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. 16 ऑक्टोबर 2016 रोजी दोन्ही संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने आले होते. ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा 19 धावांनी पराभव केला होता. या पार्श्‍वभूमीवर भारताला या मैदानावर पाच वर्षांच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे.

JSCA स्टेडियमवर जवळपास 2 वर्षानंतर 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात JSCA स्टेडियमवर कसोटी सामना खेळला गेला होता. तब्बल 4 वर्षानंतर टी-20 सामना होत आहे.

रांचीच्या मैदानावर भारताचा दबदबा

आजच्या होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया रेकॉर्ड तसाच ठेवण्याचा प्रयत्न करेल. असं झाल्यास न्यूझीलंडसोबतची तीन टी-20 सामन्यांची मालिकाही टीम इंडियाच्या ताब्यात येईल. 

या मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय T-20 सामना 12 फेब्रुवारी 2016 रोजी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. यामध्ये टीम इंडियाने 69 धावांच्या फरकाने सहज विजय मिळवला होता. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ऑक्टोबर 2017 रोजी दुसरा T20 सामना झाला, ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला.