मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग नाहीये. या दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की सिलेक्टर्सने त्यांना विश्रांती दिली आहे का की स्वतः विराट कोहलीला या दौऱ्यात सहभागी व्हायचे नव्हते. दरम्यान आता या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
विराट कोहलीला विश्रांती देण्याच्या प्रकरणावर तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. बीसीसीआयने या मुद्द्यावर अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुद्द विराटनेच बोर्डाला या दौऱ्यावर न जाण्याची विनंती केली होती.
कामाचा ताण भाग म्हणून बुमराहला विश्रांती देण्यात आलीये. मात्र सिलेक्टर्सचा कोहलीला विश्रांती देण्याचा कोणताही विचार नव्हता, असं आता समोर आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोहलीसह शक्य तितक्या मजबूत टीमची निवड करण्याची बोर्डाची सुरुवातीची योजना होती. मात्र यावेळी विराटने स्वतः टीममधनून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सना सध्याच्या इंग्लंड दौऱ्यापासून पूर्ण ताकदीने टी-20 टीम खेळायची होती. पण कोहलीने आग्रह धरला आणि विश्रांती घेतली, असंही सूत्रांनी एका इंग्रजी वेबसाईटला सांगितलं आहे.