विराटचा एक विश्वविक्रम, तर २ रेकॉर्डची बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला.

Updated: Feb 28, 2019, 04:07 PM IST
विराटचा एक विश्वविक्रम, तर २ रेकॉर्डची बरोबरी title=

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. याचबरोबर भारतानं ही टी-२० सीरिज २-०नं गमावली आहे. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असला, तरी या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहलीनं अनेक रेकॉर्ड केली आहेत. विराट कोहलीनं या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २,२०० रन पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २,२०० रन करणारा विराट हा चौथा खेळाडू आहे. विराटआधी रोहित शर्मा, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आणि पाकिस्तानचा शोएब मलिक यांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये २,२०० रन सगळ्यात जलद करण्याचा रेकॉर्ड विराटनं केला आहे.

रोहित शर्माच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २,३३१ रन बनवण्याचं रेकॉर्ड आहे. रोहितनं ही कामगिरी ९४ टी-२० मॅचमध्ये केली आहे. तर गप्टीलनं ७६ मॅचमध्ये २,२७२ रन केले आहेत. शोएब मलिकनं १११ मॅचमध्ये २,२६३ रन केले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० नंतर विराटच्या नावावर ६७ टी-२० मॅचमध्ये २,२६३ रन आहेत. यामुळे विराटनं शोएब मलिकच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. आता विराटच्या पुढे फक्त रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टील आहेत.

विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर मारण्याचा विश्वविक्रमही केला आहे. विराटनं ६७ टी-२०मध्ये २२३ फोर मारले आहेत. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशाननेही एवढ्याच फोर मारल्या होत्या. यामुळे दोन्ही क्रिकेटपटूंच्या नावावर सर्वाधिक फोर मारण्याचं रेकॉर्ड आहे.

विराट कोहलीनं टी-२० कारकिर्दीमध्ये ५०.२८ च्या सरासरीनं रन केले आहेत. १,५०० पेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये ही सर्वाधिक सरासरी आहे. १ हजारपेक्षा जास्त रन बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या बाबर आजमची सरासरी सर्वाधिक आहे. बाबर आजमनं ५३.७२ च्या सरासरीनं १,१८२ रन केल्या आहेत.

विराट कोहलीच्या नावावर टी-२०मध्ये सर्वाधिक २० अर्धशतक करण्याचं रेकॉर्डही आहे. रोहित शर्मा १६ अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकंही केली आहेत. तर विराटचा सर्वाधिक स्कोअर ९० रन आहे.