नवी दिल्ली : भारताचा कॅप्टन विराट कोहली, क्रिकेटपटू धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये खेळाडूंच्या पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बीसीसीआयनं हा प्रस्ताव मान्य केला तर विराट कोहली हा क्रिकेटमधला सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू बनणार आहे.
ग्रेड ए मधल्या खेळाडूंना 12 कोटी रुपये(कॅप्टनचा पगार त्यापेक्षा जास्त), ग्रेड बी मधल्या खेळाडूंना 8 कोटी रुपये आणि ग्रेड सी मधल्या खेळाडूंना 4 कोटी रुपये वर्षाला देण्यात यावे, अशी मागणी कोहली, धोनी आणि रवी शास्त्रींनी बीसीसीआयकडे केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं क्रिकेटबोर्ड वर्षाला 2 मिलियन म्हणजेच 12 कोटी एवढा पगार देतं. तर इंग्लंडचा कॅप्टन जो रूटलाही तेवढाच पगार मिळतो. त्यामुळे खेळाडूंनी बीसीसीआयकडे तेवढाच पगार देण्यात यावा ही मागणी केली आहे.
बीसीसीआयनं ही मागणी मान्य केली तर ग्रेड ए मधल्या खेळाडूंना वर्षाला 12 कोटी रुपयांचं तर कॅप्टन विराट कोहलीला 12 कोटींपेक्षा जास्त मानधन मिळेल. अशाप्रकारे विराट कोहली सर्वाधिक पगार असणारा खेळाडू बनेल.
बीसीसीआयशी झालेल्या करारानुसार ग्रेड ए मधल्या खेळाडूंना वर्षाला दोन कोटी रुपये मिळतात. ग्रेड बी मध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक एक कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्या खेळाडूंना ५० लाख रुपये मिळतात. याशिवाय टेस्टमध्ये पहिल्या ११ खेळाडूंना प्रत्येक मॅचचे १५ लाख रुपये, एका वनडेचे ६ लाख रुपये आणि एका टी-२०चे ३ लाख रुपये मिळतात.
विराट कोहली, धोनी, आर.अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मुरली विजय
रोहित शर्मा, के.एल.राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धीमान सहा, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग
शिखर धवन, अंबाती रायडू, अमित मिश्रा, मनीष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, हार्दिक पांड्या, केदार जाधव, युझुवेंद्र चहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदीप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, रिषभ पंत