भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरल

भारतीय बुद्धिबळ खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी (Bristy Mukherjee) ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली.  

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2024, 03:00 PM IST
भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरल title=

भारतात गेल्या काही वर्षांपासून क्रीडा क्षेत्राला महत्त्व मिळत असून, अनेक नवे खेळाडू उदयास आले आहेत. खासकरुन बुद्धिबळात जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही भारतीय खेळाडू मात्र आपली परंपरा जपताना दिसत आहेत. नुकतंच कोलकात्यात बुद्धिबळाची स्पर्धा पार पडली. यावेळी भारताची खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली. 

टाटा स्टील चेस इंडिया फेस्टिव्हल 2024 मध्ये अखिल भारतीय महिला रॅपिड इव्हेंट (इव्हेंट बी) 7/7 गुणांसह जिंकणाऱ्या मुखर्जीने प्रतिष्ठित ट्रॉफी स्विकारण्याआधी नॉर्वेजियन खेळाडूच्या पायाला स्पर्श केला. सुरुवातीला कार्लसनना काय होतंय हे समजलं नाही. पण नंतर जेव्हा कार्लसनना समजलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. 

टाटा स्टील चेस इंडिया फेस्टिव्हल 2024 मध्ये ऑल इंडिया वुमन रॅपिड इव्हेंट (इव्हेंट बी) जिंकणाऱ्या ब्रिस्टी मुखर्जीने या खेळातील दिग्गज कार्लसनकडून आशीर्वाद घेण्याची संधी सोडली नाही. समारोप समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विश्वनाथन आनंदची भेट घेतल्यानंतरही तिने असंच केलं होतं.

ट्रॉफी घेण्यासाठी बोलावल्यानंतर ब्रिस्टी मुखर्जीने सर्वात आधी विश्वनाथन आनंदचा आशीर्वाद घेतली. यानंतर ती कार्लसनकडे गेली आणि ट्रॉफी स्विकारण्याआधी पाया पडली. यादरम्यान कार्लसनच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य आलं. दरम्यान ब्रिस्टी मुखर्जी पाया पडल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. 

"हा नक्कीच एक आनंददायी अनुभव होता. गेल्या काही वर्षांपासून माझ्या वेळापत्रकात हे बसत नव्हंत. पण भारतीय भूमीवर या तरुणांसह खेळमं हा एक चांगला अनुभव होता. मी अजूनही खेळू शकतो याचाही आनंद झाला," असं कार्लसन म्हणाला.

या कार्यक्रमात मॅग्नस कार्लसन येणार हे समजल्यानंतर कोलकाता येथील कार्यक्रमात अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. अनेकांनी बसायला जागा नसल्याने पायऱ्यांवर बसूनच खेळाचा आनंद घेतला.