Viral Video: 'अरे हा तर लगानमधला लाखा निघाला,' खेळाडूने आपल्या संघाविरोधात केली फिल्डिंग; नेटकरी सैराट

सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातल एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना गोंधळ घातला.   

शिवराज यादव | Updated: Mar 4, 2024, 03:01 PM IST
Viral Video: 'अरे हा तर लगानमधला लाखा निघाला,' खेळाडूने आपल्या संघाविरोधात केली फिल्डिंग; नेटकरी सैराट title=

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओंमध्ये क्रिकेट सामन्यांमधील व्हिडीओही असतात. भारतात क्रिकेटचं वेड इतकं आहे की, प्रत्येक गल्लीत, मैदानात सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं असतं. त्यात हे व्हिडीओ स्थानिक केबल किंवा फेसबुकवर लाईव्ह दाखवले जातात. त्यामुळे या सामन्यात लगावले जाणारे फटके, झेल किंवा क्षेत्ररक्षणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यातील काही व्हिडीओ मजेशीरही असतात. हे पाहिल्यावर नेमकं हसावं की रडावं हे कळत नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना गोंधळ घातल्याचं दिसत आहे. ज्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 4 धावा मिळाल्या, हा व्हिडीओ कोणत्या सामन्यातला आहे ते समजू शकलेलं नाही.

व्हिडीओत काय आहे?

सामन्यात फलंदाज लाँग-ऑनच्या दिशेला फटका लगावतो. चेंडू सीमेच्या पलीकडे जात असताना एक खेळाडू तो अडवण्याचा प्रयत्न करतो. अगदी शेवटच्या क्षणी खेळाडू चेंडू सीमेपार जाण्यापासून अडवण्यात यशस्वी होतो. पण यावेळी त्याचा तोल जातो आणि तो मात्र पुढे जातो. यादरम्यान दुसरा खेळाडू तो चेंडू उचलून विकेटकिपरकडे टाकण्यासाठी धावतो. पण त्याने चेंडू उचलताच हातातून पडतो आणि सीमेच्या पलीकडे पडतो. यामुळे त्या खेळाडूने इतक्या मेहनतीने अडवलेला चेंडू चौकारात रुपांतरित होतो. दरम्यान यामुळे तो खेळाडू चिडतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स करत आहेत. 

दरम्यान क्रिकेटबद्दल बोलायचं गेल्यास भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने रांचीमधील चौथा सामना 5 विकेट्सने जिंकत मालिका खिशात घातली. या सामन्यात जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू नसतानाही नवख्या खेळाडूंच्या आधारे भारताने हा सामना जिंकला. 

यशस्वी जैसवाल, सरफराज खान, ध्रुव जुरेल यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं आहे. विजयासाठी 192 धावांची गरज असताना भारतीय संघाची स्थिती 120 धावांवर 5 गडी बाद झाली होती. पण शुभमन गिल (52) आणि ध्रुव जुरेल (39) यांनी 72 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं. 7 मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.