रोहितच्या खेळावर श्रीलंकन कोचची प्रतिक्रिया, रोहितने सांगितली त्याची कमजोरी

मोहालीतील मैदानावर टीम इंडियाच्या मोठ्या विजयाने टीमचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला १४१ रन्सची दमदार मात दिली.

Updated: Dec 14, 2017, 04:46 PM IST
रोहितच्या खेळावर श्रीलंकन कोचची प्रतिक्रिया, रोहितने सांगितली त्याची कमजोरी title=

नवी दिल्ली : मोहालीतील मैदानावर टीम इंडियाच्या मोठ्या विजयाने टीमचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला १४१ रन्सची दमदार मात दिली. या विजयात रोहित शर्माने मोठी जबाबदारी पार पाडली. रोहितच्या या दमदार खेळीवर अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता श्रीलंका टीमचे कोच समावीरा यांची प्रतिक्रिया आली आहे. 

काय म्हणाले समरवीरा?

आमची टीम चांगली खेळली, पण एकट्या रोहितने सामना खेचून नेला. रोहित, श्रेयस आणि शिखर धवनने चांगल्या खेळी खेळल्या. त्यामुळेच टीम इंडिया ३९२ रन्सचा स्कोर उभा करू शकली. इतक्या मोठ्या स्कोरचा सामना करणे सोपे नाहीये. सीरिज अजून आमच्या हातून गेलेली नाहीये. आम्ही विशाखापट्टणममध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.

रोहितने सांगितली त्याची कमजोरी

दुहेरी शतक लगावल्यानंतर रोहित म्हणाला की, धर्मशालातील पराभवानंतर मोहालीमध्ये क्रिकेट प्रेमी माझ्याकडून अशाच खेळाची अपेक्षा करत होते. मला वाटतं एक क्रिकेटर म्हणून हे वर्ष माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ राहिलं. मी बॉल चांगल्याप्रकारे हिट करत आहे. याआधी मी दोन दुहेरी शतकं लगावले आहेत. पण हे त्या शतकांपेक्षा अधिक खास आहे. मोहालीची विकेट खूप चांगली होती. मला पिचवर सेट व्हायला वेळ लागतो आणि आल्या आल्या शॉट लगावू शकत नाही. 

दक्षिण आफ्रिका दौ-याचं काय?

दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, ‘तिथे पिचवर जास्त बाऊंस मिळेल पण मी आधी तिथे खेळलो आहे. तिथे चांगला खेळण्याचा प्रयत्न करेन. आता माझं पूर्ण लक्ष ही सीरिज जिंकण्यावर आहे.