मुंबई : कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया मार्च महिन्यापासून मैदानात उतरली नाही. नजीकच्या भविष्यातही टीम इंडियाच्या सीरिजची शक्यता कमी आहे. कारण बीसीसीआयने जूनमध्ये प्रस्तावित असलेला टीम इंडियाचा श्रीलंका दौरा स्थगित केला आहे. श्रीलंकेसोबतच भारतीय टीम झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरही जाणार नाही.
भारतीय टीम २४ जूनपासून श्रीलंकेमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार होती. तर २२ ऑगस्टपासून भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू होणार होता. झिम्बाब्वेमध्ये भारतीय टीम ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार होती.
दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही भारताविरुद्धच्या सीरिजबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'भारताचा जून महिन्यातला श्रीलंका दौरा वेळापत्रकानुसार होणार नाही. कोरोना महामारीमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं शक्य नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे,' असं श्रीलंका बोर्डाकडून सांगण्यात आलं.
कोरोना व्हायरसमुळे भारतीय टीमने अजूनही सरावाला सुरुवात केलेली नाही. बाहेरची परिस्थिती सरावासाठी सुरक्षित होईल तेव्हाच करारबद्ध खेळाडूंसाठी कॅम्प आयोजित करण्यात येईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलसाठी आशावादी आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय आयपीएल खेळवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द झाला, तर त्याऐवजी आयपीएल खेळवली जाऊ शकते, असं बोललं जातंय.