मुंबई : टीम इंडियाचा छावा असलेल्या क्रिकेटपटून आयपीएलआधी लग्नगाठ बांधली आहे. आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने समुद्रकिनाऱ्याजवळ लग्न केलं. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या चर्चेत आहेत. टीम इंडियाचा लेग स्पिनर राहुल चाहर याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. तो आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळणार आहे.
राहुल चाहर आणि ईशानी जौहर यांच्या लग्नाचे फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. या दोघांनी खास लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं. समुद्र किनाऱ्याजवळ सप्तपदी घेतल्या. 2019 मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. 9 मार्च 2022 रोजी दोघांनी लग्न केलं.
राहुल आणि ईशानी या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन 12 मार्च रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल आणि ईशानी खूप सुंदर दिसत आहेत. रिसेप्शन सितारा हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
22 वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहर भारतासाठी 6 टी 20 सामने खेळला आहे. 6 सामन्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. 2021 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध वन डे सामना खेळून त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. राहुलला टी 20 वर्ल्ड कप दरम्यान संघातून बाहेर करण्यात आलं होतं. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला पुन्हा फार कमी संधी मिळाली.
2017 मध्ये पुणे संघातून राहुलने आयपीएलमध्ये डेब्यू केला. मात्र विशेष कामगिरी करण्यात यश आलं नाही. त्यानंतर 2018 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला 1.9 कोटी रुपये देऊन संघात घेतलं. त्याने 42 सामन्यात 43 विकेट्स घेतल्या. आता आयपीएलच्या 15 व्या हंगामात राहुल चाहर पंजाब संघाकडून खेळणार आहे.