चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात?; क्रीडामंत्र्यांचं मोठं वक्तव्य...

2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Updated: Nov 17, 2021, 02:20 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात?; क्रीडामंत्र्यांचं मोठं वक्तव्य...  title=

मुंबई : ICC ने पुढील 10 वर्षातील सर्व प्रमुख स्पर्धांचं आयोजक जाहीर केलं आहेत. खास बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये जवळपास 3 दशकांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आलंय. 

दरम्यान आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या स्पर्धेसाठी भारतीय टीम पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? तर या मुद्द्यावर यावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपलं मत मांडलं आहे. यावेळी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

अनुराग ठाकूर म्हणाले, "वेळ आल्यावर काय करायचं ते पाहू. यामध्ये गृह मंत्रालयाचा सहभाग असेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी पहाव्या लागतात. अनेक देशांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली, कारण तेथील परिस्थिती चांगली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव परिस्थिती अत्यंत बिकट असून ती चिंताजनक आहे."

राजनितिक संबंध बिघडल्यामुळे भारत-पाकिस्तान संघ अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच दोन्ही देश आमनेसामने येतात. दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला. पाकिस्तान संघाने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. 

केव्हा आणि कुठे, कोणती आयसीसी स्पर्धा

• जून 2024 T20 विश्वचषक – अमेरिका, वेस्ट इंडिज
• फेब्रुवारी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी - पाकिस्तान
• फेब्रुवारी 2026 T20 विश्वचषक - भारत, श्रीलंका
• ऑक्टोबर 2027 50 षटकांचा विश्वचषक - दक्षिण आफ्रिका, नामिबिया, दक्षिण आफ्रिका
• ऑक्टोबर 2028 T20 विश्वचषक - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड
• ऑक्टोबर 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी - भारत
• जून 2030 T20 विश्वचषक - इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड
• ऑक्टोबर 2031 - 50 षटकांचा विश्वचषक - भारत, बांगलादेश