मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे आयसीसीची मोठी जबाबदारी आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांना आता आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ते नऊ वर्षे या पदावर राहिलेल्या अनिल कुंबळेची जागा घेतील.
अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गांगुलीची आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गांगुली यांना समितीमध्ये निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. क्रिकेट समिती खेळाच्या अटी आणि नियमांवर देखरेख ठेवते.
सौरव गांगुली यांची भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते. गांगुली यांनी 1996 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
गांगुली यांनी 49 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं. गांगुली यांनी टीम इंडियाला अशा टप्प्यावर नेलं की, केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही कसं जिंकायचं हे त्यांना माहित होतं.
डावखुरा फलंदाज सौरव गांगुली यांनी त्यांच्या कारकिर्दीत 113 कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. ज्यामध्ये 16 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या. ज्यामध्ये 22 शतकं आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे.