India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"

भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. 

Updated: May 30, 2021, 07:01 PM IST
India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"  title=

मुंबई : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये 18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीवर अवलंबून नसून इतर फलंदाजही धमाकेदार कामगिरी करतील, असा आशावाद फिरकीपटू अक्षर पटेलने केलं आहे. एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षरने याबाबतचं विधान केलं आहे. (Team India are not depende only on captain Virat Kohli for England tour 2021 says Akshar Patel)

अनेकदा विविध देशातील दौऱ्यावर असताना मोठ्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. याआधी असं सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरसोबतही असं झालं आहे. जेव्हा हे खेळाडू बाद व्हायचे तेव्हा टीम इंडिया पराभूत होणार, असं गृहित धरलं जायचं. सद्यपरिस्थितीत असं विराट कोहलीसोबत होत आहे. पण टीममध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतसारखे दमदार खेळाडू आहेत. तसेच शेपटीच्या फलंदाजांमध्येही बॅटिंग करण्याची क्षमता आहे. या खेळाडूंनी आपली क्षमता आणि उपयुक्तता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दाखवून दिली. टीम इंडियाने विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. 

अक्षर काय म्हणाला?

"काही वर्षांपूर्वी मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या हृद्याचे ठोके वाढायचे. पण आता तसं नाहीये. टीममध्ये आता रोहित, अजिंक्य, रिषभसारखे खेळाडू आहेत. हे खेळा़डू गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करतायेत. यामुळे सध्या विराटवर अवलंबून राहता येणार नाही", असं अक्षरने नमूद केलं.

"भारतीय संघ विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी झाला. तसेच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराट बाद झाल्यानंतर रिषभ, वॉशिंग्टन सुंदर आणि रोहित शर्माने चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. टीम इंडियाचे फिरकीपटूही आता धावा करु लागलेत. यामुळे भारकताकडे शेवटपर्यंत बॅटिंगचा पर्याय उपलब्ध झाले आहेत. याचं उदाहरण आपल्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत वॉशिंग्टन आणि शार्दुल ठाकूरने सातव्या विकेटसाठी 123 धावांची निर्णायक अशी भागीदारी केली होती", असंही अक्षरने स्पष्ट केलं.