इंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.  

Updated: May 30, 2021, 06:12 PM IST
 इंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात भिडणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये  18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर टीम इंडियाला 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध  (India vs England)  5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारतासाठी आतापर्यंत इंग्लंड दौरा आव्हानात्मक राहिला आहे. खेळाडू आणि टीम म्हणून इंग्लंडमधील भारतीय संघाची आकेडवारी वाईट आहे. भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण 62 सामने खेळले आहेत. यापैकी अवघ्या 7 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर 34 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. (england tour is most challenging and tough for team india and players) 

शिखर धवन

शिखर धवन, टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जातो. धवन वनडे आणि टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 29 सामन्यांपर्यंत धवन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. धवनने 8 सामन्यात 380 धावा केल्या. धवनने आतापर्यंत कसोटीमध्ये 34 सामन्यांमध्ये 7 शतक आणि 5 अर्धशतकांसह 41 च्या सरासरीने 2 हजार 315 धावा केल्या आहेत. धवनच्या कसोटी कारकिर्दीला इंग्लंड दौऱ्यावरच ब्रेक लागला. त्यानंतर धवनला कसोटी सामन्यांसाठी संधी मिळाली नाही. दरम्यान धवनला श्रीलंका दौऱ्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते.  

ऑगस्ट-सप्टेंबर 2018 मध्ये धवनला इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. यावेळेस त्याने 4 कसोटी सामने खेळले. मात्र धवनला या 4 सामन्यातील 8 डावांमध्ये एकदाही अर्धशतक लगावता आले नाही. धवनने 8 इनिंगमध्ये 161 धावा केल्या. धवन इंग्लंड विरुद्ध 7 सप्टेंबर 2018 मध्ये अखेरची कसोटी खेळला. यामध्ये त्याने अनुक्रमे 3 आणि 1 धावा केली. तेव्हापासून धवन संघाबाहेर आहे. 

दिनेश कार्तिक

35 वर्षीय विकेटकीपर बॅट्समन असलेल्या दिनेश कार्तिकने 26 कसोटींमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या सामन्यांमध्ये कार्तिकने 25 च्या सरासरीने 7 अर्धशतकांसह 1 हजार 25 धावा केल्या. कार्तिकने अखेरचा कसोटी सामना 2018 मध्ये इंग्लडमध्येच खेळला. कार्तिकला तेव्हा 2 कसोटींमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये कार्तिकने  4 डावांपैकी 3 डावांमध्ये त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्याची 20 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने एकूण 4 डावांमध्ये 21 धावा केल्या. 

एस श्रीसंथ 

एस श्रीसंथने आतापर्यंत 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी 20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. श्रीसंथने अखेरची टेस्ट ऑगस्ट 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध ओव्हलमध्ये खेळली होती. दरम्यान 2013 मध्ये श्रीसंथ स्पॉट फिक्सिंगमध्ये आढळला. तेव्हा त्याच्यावर बंदी घालण्यात आली. श्रीसंथ सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळतोय. श्रीसंथने 27 कसोटींमध्ये 38 च्या एव्हरेजने 87 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीसंथने 3 वेळा 5 पेक किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघ जुले-ऑगस्ट 2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील 3 कसोटींमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. 

आरपी सिंह 

भारताचा माजी वेगवाग गोलंदाज आरपी सिंह टीम इंडियाकडून 14 टेस्ट, 58 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळला आहे. आरपी 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. कसोटीमध्ये 42 च्या सरासरीने 40 विकेट्स घेणाऱ्या आरपीला ऑगस्ट 2011 पासून कसोटी संघात स्थान मिळालं नाही. आरपीने ऑगस्ट 2011 साली ओव्हलमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यामध्ये त्याने 34 ओव्हर बॉलिंग केली होती.