T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपचं बिगूल वाजलंय. येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू आपापल्या देशाकडून मैदानात उतरणार आहेत. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ट्रेव्हिस हेड, जोस बटलर, रचिन रविंद्र या खेळाडूंवर क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. पण या खेळाडूंच्या आधी वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने टी20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात धमाल उडवून दिली. आयीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या निकोलस पूरनने पहिल्याच सराव सामन्यात तुफान फटकेबाजी केली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सराव सामना (West Indies vs Australia Practice Match) खेळवण्यात आला. या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांची बरसात झाली. वेस्ट इंडिजचा संघ या सराव सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाने काही प्रमुख खेळाडूंना बाहेर बसवलं होतं. यात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांना विश्रांती देण्यात आली होती. पण यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या संघाने जोरदार झुंज दिली.
पूरनची स्फोटक खेळी
वेस्ट इंडिजच्या प्रत्येक खेळाडूने फलंदाजीचा चांगलाच सराव करुन घेतला. पण यात खरी धमाल केली ती निकोलस पूरनने (Nicolas Pooran). पूरनने आपल्या फलंदाजीचीच सुरुवातच षटकाराने केली. पहिल्या चार चेंडूवर पूरनने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली. अवघ्या 16 चेंडूत निकोलस पूरनने अर्धशतक ठोकलं. पूरनने तब्बल 300 च्या स्ट्राईक रेटने 75 धावा केल्या. यात त्याने 8 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली.
आयपीएलमध्ये चमकलेल्या विंडीज कर्णधार रोवमन पॉवेलनेही 25 चेंडूत 52 धावा केल्या. तर केकेआरच्या शेरफेन रुदरफोर्डने 18 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. वेस्ट इंडिजने निर्धारीत 20 षटकात 4 विकेट गमावत 257 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचं तोडीस तोड उत्तर
वेस्ट इंडिजच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियानेही तोडीस तोड उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाने सुरुवातच आक्रमक केली. सलामीवर एश्टन एगरने 13 चेंडूत 28 धावा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर जोश इंग्लिस आणि नाथन एलिसने फटकेबाजी करत धावा वाढवल्या. पण ऑस्ट्रेलियाला 222 धावांवर समाधान मानावं लागले आणि ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभव स्विकारावा लागला.