T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. यंदाची स्पर्धा खास असणार आहे, कारण जेतेपदासाठी यंदा तब्बल 20 संघांमध्ये चुरस असणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाज वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तरित्या टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. टीम इंडियाचे (Team India) ग्रुपमधले तीन सामने अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथल्या नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. 2007 मध्ये पहिल्या टी20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं. पण त्यानंतरही एकदाही टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
बीसीसीआयने यंदा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली. हा संघ टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगुन आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचे दिग्गज आणि अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. कदाचित या दोघांचा हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप असू शकतो.
विराटच्या कामगिरीवर लक्ष
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. अशात आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटकडे इतिहास रचण्याची संधी आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकारांचा हा विक्रम असणार आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने 25 डावात आतापर्यंत 103 चौकार लगावले आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटने आणखी 9 चौकार लगावल्यास टी20 वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरणार आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. जयवर्धनेने 25 डावात 111 चौकार लगावले आहेत. या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला 8 चौकारांची गरज आहे. तर 9 चौकार लगावल्यास तो जयवर्धनेच्या पुढे जाईल.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकारांच्या यादीत श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 34 सामन्यात 101 चौकार लगावले आहेत. तर टीम इंडियाचा कर्णधार 91 चौकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या नावावर 86 चौकार जमा आहेत.
भारतीय संघाचं वेळापत्रक
दरम्यान, टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होईल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. तर 9 जुनला टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने असतील. यानंतर 12 जूनला टीम इंडिया अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा विरुद्ध दोन हात करेल.
टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.