T20 World Cup 2024: भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव करण्याची आपली मालिका कायम ठेवली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने फक्त 120 धावांचं सोपं आव्हान दिलेलं असतानाही पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघ एकावेळी 72 धावांवर 2 गडी बाद अशा भक्कम स्थितीत असतानाही जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वात गोलंदाजांनी शांत डोक्याने केलेल्या गोलंदाजीमुळे भारताने सामना जिंकला असं पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Head coach Gary Kirsten) म्हटलं आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी अनुकूल स्थिती असतानाही भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या आधारे 6 धावांनी सामना जिंकला.
हे फारच निराशाजनक आहे, हे नक्की असं गरी कर्स्टन म्हणाले आहेत. "मला माहिती होतं की, 120 ही धावसंख्या फार सहज टार्गेट नव्हतं. जर भारतीय संघ फक्त 120 धावा करु शकला आहे, तर आपल्यालाही ते सोपं जाणार नाही याची मला कल्पना होती. पण मला वाटतं जेव्हा 72 धावांवर 2 गडी बाद आणि 6 ते 7 ओव्हर्स शिल्लक अशी स्थिती होती तेव्हा सामना आमच्या हाता होता. पण त्या स्थितीतून आम्ही जिंकू शकलो नाही हे नक्कीच निराशाजनक आहे," अं त्यांनी म्हटलं.
मोहम्मद रिझवानने डावाच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात 44 चेंडूत 31 धावा करत पाकिस्तान संघाला एकहाती विजयाच्या दिशेने नेलं होतं. पण बुमहारच्या नव्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. सामनावीरचा पुरस्कार पटकावणाऱ्या जसप्रीत बुमराहने इफ्तिखार अहमदलाही या ओव्हरमध्ये बाद केलं. बुमरहाने 14 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. तसंच त्याने एकूण 11 डॉट बॉल टाकले.
गॅरी कर्स्टन यांनी चुकीचे निर्णय पाकिस्तान संघाला महागात पडले असं सांगितलं आहे. चुकीच्या निर्णयांची किंमत पाकिस्तान संघाला मोजावी लागली असं विश्लेषण त्यांनी केलं. ते म्हणाले की, "फार चांगले निर्णय घेण्यात आले नाहीत. तुमच्या हातात सामना होता, आठ विकेट हातात होत्या, त्यावेळी योग्य निर्णय घेणं हाच खरा खेळ आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. जर तुम्ही अशा चुका केल्या तर त्याची किंमत मोजावी लागते. रिझवान चांगला खेळला. या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण आहे याची आम्हाला कल्पना होती. आम्ही चांगल्या प्रकारे पाठलाग केला, पण शेवटच्या क्षणी सामना हातातून निसटला".
पाकिस्तान आता 11 जूनला न्यूयॉर्क संघाशी भिडणार आहे. तसंच 16 जूनला आयर्लंडविरोधातील ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना खेळतील.