Smoking cigarettes Affect On Health: सिगारेट ओढणा-यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. सिगारेट ओढणाऱ्या माणसाचं आयुष्य एका सिगारेटगणिक कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. एक सिगारेट ओढणाऱ्या माणसाचं आयुष्य 17 मिनिटांनी तर सिगारेट ओढणाऱ्या महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होत असल्याचं एका शास्त्रीय पाहणीतून समोर आलंय.
तुम्ही सिगारेट ओढत असाल तर जरा थांबा. तुमच्या हातातील सिगारेटचा झुरका घेऊ नका. कारण तुमच्या हातातली एक सिगारेट तुमचं आयुष्य 17 ते 22 मिनिटांनी कमी करणार आहे. हे आम्ही सांगत नाही, हे निष्कर्ष काढलेत, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडननं. युसीएल विद्यापीठानं केलेल्या पाहणीत काही धक्कादायक निष्कर्ष काढलेत.
समोर आलेल्या निष्कर्षानुसार, एक सिगारेट ओढल्यास पुरुषाचं आयुष्य 17 मिनिटांनी कमी होतं. एक सिगारेट ओढल्यास महिलेचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होतं. सिगारेट ओढणा-याचं आयुष्य वर्षाला सरासरी 50 दिवसांनी कमी होतं. सिगारेट विडी ओढणा-याचं आयुष्य सरासरी 10 वर्षांनी घटतं, असंही यात म्हटलंय.
धुम्रपानामुळं अनेक शारिरिक व्याधी जडतात. साहजिकच त्याचा परिणाम आयुष्यमान घटण्यात होतो असं तज्ज्ञ सांगतात. ह्रदय रोग आणि डायबिटीज असलेल्या रुग्णांनी तर सिगारेट ओढूच नये असं डॉक्टर सांगतात. ह्रदय रोग आणि डायबिटीज असलेल्या रुग्णांच्या जखमा बऱ्या होत नाहीत. शिवाय त्यांचे गंभीर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. तुम्ही सिगारेट ओढत असाल तर आताच सोडा. आताही वेळ गेलेली नाही. सिगारेट ओढणं सोडल्यास तुम्हाला काय फायदे होतील ते आम्ही सांगतोय.
नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेट सोडली तर फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. 20 फेब्रुवारीला तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल पक्षाघात होण्याचा धोका 50 टक्क्यांनी घटेल. ह्रदयरोगाची शक्यताही निम्म्यानं कमी होईल. धुम्रपान करणा-यापेक्षा तुम्ही जास्त जगण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे आयुष्य घटवणाऱ्या सिगारेटपासून लांब राहा. सिगारेटचा एक-एक झुरका तुमचं आयुष्य घटवेल. त्यामुळं राहा सावधान.