Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) सकाळी 6 वाजता बारबाडोसमधून नवी दिल्लीत दाखल झाली. टीम इंडियाला एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणलं गेलं. दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दिल्ली विमानतळावरुन टीम इंडिय आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये पोहोचली. यादरम्यान ढोलताशांच्या गजरात टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. पीए मोदींनी टीम इंडियाशी मनसोक्त गप्पा मारल्या.
टीम इंडियला अनोखी मानवंदना
दिल्लीहून टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली. विस्तारा एअरलाईन्सच्या विशेष विमानाने टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत दाखल झाले. यावेळी मुंबई विमानतळावर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. टीम इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर (Mumabi Airport) पोहोचताच या विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. सीनिअर पायलट किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलचा व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर किंवा एखाद्या विमानाचं पहिलं किंवा शेवटचं उड्डाण असल्यावर वॉटर कॅनन सॅल्यूट दिला जातो.
टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्सना घेऊन आलेल्या विमानाचं यावेळी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानाला दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे सोडून खास सलामी देण्यात आली. विशेष प्रसंगी स्वागताची विमानतळ प्राधिकरणाची ही खास पद्धत आहे. त्यानुसार जगज्जेता ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला याद्वारे विशेष मानवंदना देण्यात आली. त्यानंतर टीम इंडियाचं मुंबईकरांनी विमानतळावर जंगी स्वागत केलं. टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावून मुंबईकरांना अभिवादन केलं. त्यानंतर बसमधून टीम इंडिया वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना झाली.
Team India's flight UK1845 got a water salute from Mumbai airport. The craze for #TeamIndia is beyond imagination Can't wait to see the scenes at Marine Drive #indiancricketteam #VictoryParade pic.twitter.com/Pdt8WwU6Cq
— Prathmesh Pophale (@Prath_Pophale11) July 4, 2024
रोहित-विराटसाठी खास विमान
ज्या विमानाने टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला रवाना झालं त्या विमानाचं नाव UK 1845 असं ठेवण्यात आलं होतं. विस्ताराचं हे विशेष विमान विराट कोहली आणि रोहित शर्माला समर्पित करण्यात आलं होतं. वास्तविक विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर 18 आणि रोहित शर्माच्या जर्सीचा नंबर 45 आहे. यावरुन या विमानाचं नाव UK 1845 असं ठेवण्यात आलं.
टीम इंडियाची विजयी मिरवणूक
मुंबईत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून जगज्जेत्या टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लाखोंचा जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमच्या मार्गावर उपस्थित होता. टीम इंडियाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.