Government Big Decision: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवल्यानंतर एक मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने घेतला आहे. आचारसंहिता संपुष्टात येताच रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘पक्षपाती’पणा केल्याच्या आरोपामुळे पदावरून हटविण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना फडणवीसांच्या गृह विभागाने संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांच्या सक्तीच्या रजेचा कार्यकाळ संपला आहे. रश्मी शुक्ला यांनी पुन्हा पदभार स्वीकारावा असा आदेश गृह विभागाने काढला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक काळात पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शुक्ला यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी शुक्ला यांना महासंचालकपदावरून दूर केले होते व त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले. हे आदेश आता रद्द करत शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कारवाईनुसार सरकारने संजीव कुमार वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. राज्याच्या गृह विभागाने शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. रविवारी निवडणूक प्रक्रिया संपल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. त्यानंतर सोमवारी राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी शुक्ला यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या पुनर्नियुक्तीची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या विनंतीनुसारच सोमवारी गृह विभागाने शुक्ला यांची पुन्हा महासंचालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला होता. त्यासंदर्भातील मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा पदभार स्वीकारण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. रश्मी शुक्ला आज महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचेही आरोप करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्याविरोधात कारवाईही केलेली. मात्र राज्यात महायुतीचं सरकार येताच त्यांची पोलीस दलातील सर्वोच्च पदी नियुक्ती करण्यात आली.