Mumbai News : मुंबई... एक असं ठिकाण जे अनेकांसाठी पर्यटनस्थळ आहे. काहींसाठी पोट भरण्याचं साधन आहे तर काहींसाठी निवारा आहे. अशा या शहरात दर दिवशी असंख्य नागरिकांची ये-जा असते. दर दिवशी या शहराता लहानसा कोपरा तरी बदलत असतो. अशा या बदलाच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेतून जाणाऱ्या मुंबई शहरानं कैक वर्षांपासून कात टाकत इथं येणाऱ्या आणि राहणाऱ्या प्रत्येकालाच भारावून सोडलं आहे. याच मुंबईत आता जागतिक स्तरावरील आकर्षणाचा आणखी एक प्रकल्प जवळपास पूर्णत्वास गेला आहे. सामान्यांसह पर्यटकांसाठीही हा प्रकल्प एक कुतूहलाचा विषय ठरेल यात वाद नाही.
मुंबई शहराला येत्या काळात पहिलीवहिली गर्द जंगलवजा झाडीतून जाणारी आणि समुद्रकिनाऱ्याची झलक अगदी सहजपणे पाहता येईल अशी पायवाट मिळणार असून, त्याचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. मुंबईतील मलबार हिल या तुलनेनं गर्द झाडी असणाऱ्या भागामध्ये हा Elevated Walkway बांधण्यात येत असून, यासाठी सिंगापूरच्या प्रसिद्ध 'एलिवेडेड फॉरेस्ट वॉकवे'ची प्रेरणा घेण्यात आली आहे. ही पायवाट मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होणार असून सुरेख अशा वळणानं डूंगरवाडी इथं पोहोचेल.
ही पायवाट अतिशय सुंदररित्या लाकडापासून तयार करण्यात आली असून, ती साकारताना कमीत कमी सिमेंट काँक्रिटचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. लाकडाच्या भालांवर असणारी ही अधांतरी वाट आणि पावसाच्या दिवसांमध्ये या टेकडीवरून वाटेखालून वाहणारे पाण्याचे पाट असंच एकंदर चित्र मुंबकरांना आणि इथं येणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
कमला नेहरू पार्कच्या अगदी मागे असणाऱ्या सिरी रोड इथून या पायवाटेचा प्रवेश आणि निकास असेल. मलबार हिलवर असणाऱ्या दाट वनक्षेत्रातून या वाटेचा मोठा भाग जाक असून तिथंच एका वळणावर उभं राहिलं असता मुंबईतील विस्तीर्ण समुद्राची झलकही पाहता येणार आहे. या पायवाटेचा काही भाग काटेपासून साकारण्यात येणार असून या पारदर्शक तळातून पक्षीनिरीक्षणही करता येणार आहे.
जवळपास 25 कोटी रुपयांचा निधी खर्ची घालत तयार होणारा हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला असून, नव्या वर्षात अर्थात 2025 च्या सुरुवातीलाच तो सामान्यांसाठी खुला करण्याचा मानस बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ठेवला आहे. सध्या या प्रकल्पासाठी रोषणाई, सजावट, शेवटच्या टप्प्यातील बांधकाम, विश्रांतीगृह आणि तिथं भेट देण्यासाठीची तिकीट या सर्व गोष्टींवर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
रेल्वेनं इथं पोहोचायचं झाल्यास पश्चिम रेल्वेनं चर्नीरोड स्थानकावर येऊन तिथून टॅक्सीनं मलबार हिल गाठणं हा सर्वात सोपा पर्याय असेल. मध्य रेल्वेनं इथं यायचं झाल्यास सीएसएमटीहून टॅक्सी करून तुम्ही थेट इथं पोहोचू शकता. काय मग? या अनोख्या अनुभवासाठी तुम्ही सज्ज आहात का?