IND vs PAK Match: शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचं युद्ध रंगलं होतं. अनेक चाहते हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. अशातच या सामन्यादरम्यान स्विगीने केलेल्या एक ट्विटची चर्चा रंगली आहे. फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीकडे 3509 कंडोमचे ऑर्डर आले होते. स्विगी ( swiggy ) ने स्वतः एक्स ( ट्विटरवरून ) याची माहिती दिली आहे.
स्विगीने एक्सवर लिहिलंय की, 3509 कंडोमचे ऑर्डर देण्यात आले आहेत. स्विगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध आणि मजेशीर कमेंट्स केले आहेत. स्विगीच्या या पोस्टवर कंडोम मेकर ड्यूरेक्स इंडिया (Durex India) नेही कमेंट केली आहे.
केवळ कंडोमच नाही तर चाहत्यांनी मॅचदरम्यान बिर्याणीही भरपूर ऑर्डर केल्याचं समोर आलं. स्विगीने शनिवारी सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान प्रति मिनिट 250 पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळाल्या. सामना सुरू झाल्यापासून स्विगीवर प्रति मिनिट 250 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्या.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, 'चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी 70 बिर्याणींची ऑर्डर दिली होती. कदाचित ते आधीच सेलिब्रेशन करत होते.'
याशिवाय भारतीयांनी सामन्यादरम्यान 1 लाखांहून अधिक कोल्ड्रिंक्स ऑर्डर केले होते. स्विगीने ट्विटरवर पोस्ट केलंय की, 'ब्लू लेज (चिप्स) आणि ग्रीन लेजच्या अनुक्रमे 10,916 आणि 8,504 पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली होती. आणि इथे पण ब्लू जिंकताना दिसतंय.
रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी खूपच फायदेशीर ठरलेला दिसला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानची टीम अवघ्या 191 रन्सवर आटोपली. यावेली पाकिस्तानकडून केवळ बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने चांगली खेळी केली.
यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्फोटक खेळी केली. हिटमॅनने 86 रन्सची खेळी केली. भारताने शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्स राखून पराभव केला.