कोलकाता : बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली. या भेटीनंतर विराट कोहली डे-नाईट टेस्ट मॅच खेळण्यासाठी तयार असल्याचं गांगुलीने सांगितलं. बांगलादेशविरुद्धच्या सीरिजआधी गांगुलीने मुंबईत कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
'आम्ही सगळे डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल विचार करत आहोत. माझा डे-नाईट टेस्ट मॅचवर विश्वास आहे. कोहलीनेही यासाठी समर्थन केलं आहे. विराट डे-नाईट टेस्टच्या विरोधात आहे, अशा काही बातम्या येत होत्या, पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. खेळाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि हाच पुढचा मार्ग आहे. लोकांनी काम संपवून चॅम्पियन खेळाडूंना पाहायला आलं पाहिजे. हे कधी होईल, मला माहिती नाही, पण हे नक्की होईल,' असं गांगुली म्हणाला.
सौरव गांगुलीला टीमचा पुढचा रोडमॅप काय आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा 'टीमने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही मोठी स्पर्धा जिंकली नाही, त्यामुळे पुढचा रोडमॅप वेळेसोबत येईल. भारतीय क्रिकेटचा ढांचा चांगला आहे. यामध्ये पैसाही आहे. आयपीएल इपीएलप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी लीग आहे. लोकप्रियतेच्याबाबतीत आयपीएल इपीएलपेक्षा कमी नाही,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
प्रत्येक स्तरावरच्या क्रिकेटपटूंची मदत करणं माझी प्राथमिकता आगे. भारताकडून खेळू न शकणाऱ्या खेळाडूंना चांगली सुविधा मिळावी, ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. क्रिकेटला विश्वसनीय आणि स्वच्छ बनवण्याची माझी इच्छा आहे, असं वक्तव्य गांगुलीने केलं.