नवी दिल्ली : दिल्ली आणि कोलकात्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याच्या शिवम मावीनं यंदाच्या आयपीएलमधल्या सर्वाधिक रन दिल्या आहेत. याआधी हे रेकॉर्ड बंगळुरूचा उमेश यादव आणि हैदराबादच्या राशिद खानच्या नावावर होतं. शिवमच्या या ओव्हरमुळे दिल्लीनं कोलकात्यापुढे २१९ रनचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याला २० ओव्हरमध्ये १६४ रन करता आल्या आणि दिल्लीचा ५५ रननी शानदार विजय झाला. शिवमच्या एका ओव्हरमध्ये २९ रन आल्या नसत्या तर कोलकात्यानं दिल्लीला २०० रनच्या आतमध्ये रोखलं असतं.
कोलकात्याचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं शेवटची ओव्हर शिवम मावीला द्यायचा निर्णय घेतला तेव्हा दिल्लीचा स्कोअर १९०/३ असा होता. कार्तिककडे शिवमऐवजी सुनिल नारायण, कुलदीप यादव आणि आंद्रे रसेल हे बॉलिंगसाठीचे पर्याय उपलब्ध होते. पण कार्तिकनं मावीला बॉलिंग द्यायचा निर्णय घेतला. पण दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर या मॅचमध्ये फॉर्ममध्ये होता. मावीच्या बॉलिंगला सुरुवात होण्यापूर्वी अय्यर ३४ बॉलमध्ये ६५ रनवर खेळत होता.
शिवम मावीच्या पहिल्या दोन बॉलवर अय्यरनं २ उत्तुंग सिक्स मारले. तिसऱ्या बॉलवर अय्यरला एकही रन काढता आली नाही. यानंतर चौथ्या बॉलला पुन्हा अय्यरनं सिक्स मारली. यापुढचा बॉल मावीनं वाईड टाकला. तीन सिक्सनंतर मावीच्या पाचव्या बॉलला अय्यरनं फोर मारली आणि शेवटच्या बॉलला पुन्हा सिक्स मारली. अशाप्रकारे श्रेयस अय्यरनं मावीच्या एकाच ओव्हरमध्ये २९ रन केले. मावीनं त्याच्या पहिल्या ३ ओव्हरमध्ये २९ तर शेवटच्या ओव्हरमध्येही २९ रन दिले.
आयपीएलच्या अकराव्या मोसमात याआधी उमेश यादव आणि राशिद खानच्या नावावर सर्वाधिक रन देण्याचं रेकॉर्ड होतं. उमेश यादवनं राजस्थानविरुद्ध २७ रन आणि राशिद खाननं पंजाबविरुद्ध २७ रन दिले होते. क्रिस गेलनं राशिद खानच्या एका ओव्हरला २६ रन केले होते. तर अय्यरनं मावीच्या ओव्हरमधल्या २९ रनपैकी २८ रन काढल्या. या मोसमात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रमही अय्यरच्या नावावर झाला आहे.