रोहित शर्मानं जिंकवली मॅच पण धोनीनं बनवलं खास रेकॉर्ड

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद ५६ रनच्या खेळीमुळे आयपीएलमध्ये मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला.

Updated: Apr 29, 2018, 05:28 PM IST
रोहित शर्मानं जिंकवली मॅच पण धोनीनं बनवलं खास रेकॉर्ड title=

पुणे : मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद ५६ रनच्या खेळीमुळे आयपीएलमध्ये मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. चेन्नईनं २० ओव्हरमध्ये १७० रन केले. मुंबईनं हे आव्हान दोन बॉल आणि ८ विकेट राखून पार केलं. ७ मॅचमधला मुंबईचा हा दुसरा विजय आहे. रोहित शर्मानं या मॅचमध्ये मुंबईला जरी विजय मिळवून दिला असला तरी चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. हे असं रेकॉर्ड आहे जे आजपर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूला बनवता आलेलं नाही.

धोनीचं रेकॉर्ड

आयपीएलमध्ये १५०व्या वेळी धोनी टीमचं नेतृत्व करत होता. धोनीनंतर गंभीर हा एकमेव खेळाडू आहे ज्यानं १०० पेक्षा जास्त आयपीएल मॅचमध्ये नेतृत्व केलं आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं २००७ चा टी-20 वर्ल्ड कप, २०११ चा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळाला. आयपीएलमध्येही धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची टीम दोनवेळा ट्रॉफी जिंकली. तर ४ वेळा चेन्नईची टीम दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

आयपीएलमध्ये लागोपाठ १० सीझन खेळणाऱ्या ३६ वर्षांच्या धोनीनं ८ सीझन चेन्नईचं नेतृत्व केलं. २०१६ साली धोनीला पुण्याचं कर्णधारपद देण्यात आलं. २०१७ मध्ये मात्र पुण्याच्या टीमनं धोनीऐवजी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवलं.

धोनीचा करिश्मा अजूनही कायम

२०१८ सालच्या आयपीएलमध्ये धोनीनं १६५.६६ चा स्ट्राईक रेट आणि ६९.६६ च्या सरासरीनं ६ मॅचमध्ये २०९ रन बनवल्या आहेत. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं ३४ बॉलमध्ये ७० रनची वादळी खेळी करुन चेन्नईला मॅच जिंकवून दिली. या मॅचमध्ये धोनीनं ७ सिक्स आणि ४ फोर लगावल्या. टी-20 क्रिकेटमध्ये ५ हजार रन पूर्ण करणारा धोनी पहिला भारतीय कॅप्टन बनला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये चेन्नईनं २०६ रनचं लक्ष्य पार केलं.