मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. या विजयासोबतच भारताने ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. या मॅचमध्ये विराट कोहलीने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. विराटच्या या खेळीमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. या कामगिरीबद्दल विराटला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच मिळवण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये विराटने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीची बरोबरी केली आहे. विराट आणि शाहिद आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ११ मॅन ऑफ द मॅच मिळाले आहेत. तर या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद नबीला १२ वेळा मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.
आपल्या रेकॉर्डशी बरोबरी केल्यानंतर शाहिद आफ्रिदीनेही विराटचं कौतुक केलं आहे. विराटचं अभिनंदन. भविष्यातही असंच यश मिळवं हीच प्रार्थना आहे. जगातल्या क्रिकेट चाहत्यांना असाच आनंद दे, असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं आहे.
Congratulations @imVkohli You are a great player indeed, wish you continued success, keep entertaining cricket fans all around the world. https://t.co/OoDmlEECcu
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) September 18, 2019
मोहालीतल्या अर्धशतकी खेळीबरोबरच विराटची टी-२० क्रिकेटमधली सरासरीही ५०च्या पुढे झाली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. विराटची टी-२०मध्ये ५३.१४, वनडेमध्ये ६०.३१ आणि टेस्टमध्ये ५३.१४ एवढी सरासरी आहे.
विराटने ७९ टेस्टमध्ये ६,७४९ रन, २३९ वनडेमध्ये ११,५२० रन आणि ७१ टी-२०मध्ये २४४१ रन केले आहेत. टी-२०मध्ये विराट हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. तसंच टी-२०मध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. टी-२०मध्ये विराटने आतापर्यंत २२ अर्धशतकं केली आहेत.