'बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असेल तरच..'; ऋतुराजबद्दल हे काय बोलून गेला क्रिकेटपटू

Ruturaj Gaikwad Relationships Actresses: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये निवड न झाल्याने सध्या मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चांगलाच चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना आता त्याचा उल्लेख करत एका क्रिकेटपटूने व्यक्त केलेलं मत सध्या चांगलेच चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 21, 2024, 10:38 AM IST
'बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असेल तरच..'; ऋतुराजबद्दल हे काय बोलून गेला क्रिकेटपटू title=
या क्रिकेटपटूने स्वत: शेअर केला व्हिडीओ (प्रातिनिधिक फोटो)

Ruturaj Gaikwad Relationships Actresses India tour Sri Lanka 2024: भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात असते. तसेच निवड समितीकडे आयपीएलबरोबरच इतर घरगुती स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंचे पर्याय उपलब्ध असतात. राष्ट्रीय संघामध्ये निवड होणं त्यामुळेच विशेष मानलं जातं. काही आठवड्यांपूर्वीच रिंकू सिंहला याच स्पर्धेमुळे टी-20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळालेलं नाही. तर आता मराठमोळा सलामीवीर तसेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला आता या स्पर्धेचा फटका बसला आहे. ऋतुराजला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये टी-20 तसेच एकदिवसीय संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. खरं तर हे दोघेही उत्तम क्रिकेटपटू असून त्यांची कामगिरीही उत्तम राहिलेली आहे. असं असतानाही त्यांना अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेलं नाही. खरं तर खेळाडूंची निवड करताना कोण कोणत्या क्रमांकावर खेळणार आणि त्याची संघात काय भूमिका असणार यावरुन खेळाडूंना प्राधान्य क्रम दिला जातो. पण अशापद्धतीच्या निवडीने सर्वचजण समाधानी असतात असं नाही. बरेच आजी-माजी क्रिकेटपटू याबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. भारताची माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज एस. बद्रीनाथने अशाचप्रकारे उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

स्वत: व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा

एस. बद्रीनाथने स्वत: सोशल मीडियावर आपल्या मुलाखतीमधील एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये या क्रिकेटपटूने निवड समितीवर निशाणा साधला आहे. ऋतुराज गायकवाडला श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल बद्रीनाथने आश्चर्य व्यक्त केलं आहे. उत्तम कामगिरी केल्यानंतरही ऋतुराजला संघाबाहेर बसावं लागल्याचं पाहून बद्रिनाथ फारच संतापल्याचं त्याने केलेल्या विधानावरुन स्पष्ट होत आहे. बद्रिनाथने थेट निवड समितीवर निशाणा साधताना निवड होण्यासाठी तुमचं व्यक्तीमत्व रावडी असणं अपेक्षित आहे का? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'

तसेच अंगावर टॅट्यू असणं किंवा एखाद्या अभिनेत्रींबरोबर काही रिलेशन असेल तरच खेळाडूची निवड केली जाईल असा काही प्रघात आहे का? असा सवालही त्याने केला आहे. सातत्याने निवड होण्यासाठी टॅट्यू, अभिनेत्रीबरोबर नातं आणि इतर काही विशिष्टं गोष्टी आवश्यक असतात का असा उपहासात्मक प्रश्न बद्रीनाथने विचारला आहे.

अभिनेत्रींबरोबर रिलेशन गरजेचं?

बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर काही रिलेशन असेल तरच संघात निवड होते का असा प्रश्न विचारताना, "रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नाही हे पाहिल्यानंतर तुमची व्यक्ती म्हणून प्रतिमा रावडी असली पाहिजे तरच निवड होईल असं वाटतं. संघात स्थान मिळवायचं असेल तर तुमचं बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असणं, प्रसारमाध्यमांबरोबर तुम्हाला नीट संगनमत करता येणं आणि अंगावर टॅट्यू असणं गरजेचं आहे. असंही वाटतं," असा टोला बद्रीनाथने लगावला आहे. बद्रीनाथने ऋतुराजची बाजू घेतल्याबद्दल चाहत्यांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी ज्या पद्धतीने त्याने विवाहित ऋतुराजबद्दल आपली बाजू मांडली ती काही चाहत्यांना खटकल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

झिम्बाब्वेविरुद्ध ऋतुराजची दमदार कामगिरी

ऋतुराजने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये 7,77 आणि 49 धावा केल्या होत्या. त्याला शेवटच्या म्हणजेच पाचव्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आलेली नव्हती. आता श्रीलंकन दौऱ्यासाठी निवड समितीने यशस्वी जयसवाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे.