भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सिडनीत (Sydney) सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. खराब फॉर्ममध्ये असल्या कारणाने रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत:हून पाचव्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर (Border Gavaskar Trophy) भारतीय संघ पुढील पाच महिने एकही कसोटी सामना खेळणार नाही आहे. दुसरीकडे 38 वर्षीय रोहित शर्मासाठी वेळ आता संपत चालली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा पाच डावांत फक्त 31 धावा करु शकला आहे. ही बाब त्याच्याही मनाला लागली असून, त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
"मी आता माघार घेतली आहे, इतकंच सांगू शकतो. माझं प्रशिक्षक आणि निवडकर्त्याशी बोलणं झालं ते अगदी साधं होतं की मी धावा करण्यात अपयशी ठरत आहे. मी सध्या फॉर्ममध्ये नाही. हा एक महत्त्वाचा सामना असून, आम्हाला जिंकायचा आहे. आम्ही फॉर्ममध्ये नसणाऱ्या खेळाडूंना खेळवू शकत नाही. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. माझ्यासाठी हा निर्णय घेणं फार सोपं नव्हतं," असं रोहित शर्मा म्हणाला.
"हे विचार गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या डोक्यात होते. येथे आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मेलबर्ननंतर नवीन वर्षाचा दिवस होता. त्या दिवशी मला प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना याबाबत सांगण्याची इच्छा नव्हती. मी प्रयत्न करत होतो पण धावा करु शकत नसल्याने मला बाजूला होणं गरजेचं होतं," असं त्याने स्पष्ट केलं.
रोहित शर्माने आपल्या निवृत्तीच्या चर्चांवरही भाष्य केलं. रोहित शर्माने विश्रांती घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी तो कदाचित त्याचा अखेरचा सामना खेळला आहे असं विधान केलं होतं. पण रोहित शर्माने आपण कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
"पाच महिन्यांनी काय होईल यावर माझा विश्वास नाही. मला वर्तमानावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. हा निवृत्तीचा निर्णय नाही. मी खेळापासून दूर जाणार नाही. पण या सामन्यातून मी बाहेर पडलो आहे कारण धावाच होत नाही आहेत. पाच महिन्यांनी मी धावा करणार नाही याची काही शाश्वती नाही. प्रत्येक दिवशी आयुष्य बदलत असतं. माझा माझ्यावर विश्वास आहे," असं रोहित म्हणाला.
"त्याचवेळी मला वास्तववादी असायला हवं. मी इतका वेळ हा खेळ खेळला आहे. मी केव्हा जायचे, बाहेर बसायचे किंवा संघाचे नेतृत्व करायचे हे बाहेरून कोणीही ठरवू शकत नाही. मी समजूतदार, परिपक्व, दोन मुलांचा बाप आहे. मला माहित आहे की मला आयुष्यात काय हवे आहे," असं उत्तर रोहित शर्माने टीकाकारांना दिला आहे.
जेव्हा अँकरने, "तुला भारतीय कर्णधार म्हणून खेळताना पाहताना आनंद झाला" असं सांगत समारोप घेतला तेव्हा रोहित शर्माने लगेचच 'अरे मी कुठेच जात नाही आहे' असं स्पष्ट केलं.
"मी आतापर्यंत फक्त बाहेर बसण्यासाठी आलो नाही. मी संघासाठी सामने जिंकण्यासाठी आलो आहे. पण कधीकधी, तुम्हाला संघाची गरज काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही संघाचा विचार करत नाही, तर तुम्ही का आहात? मी इतरांबद्दल बोलू शकत नाही," असं तो म्हणाला.