WC पराभवानंतर मैदानात रडलेला रोहित शर्मा 20 दिवसांनी आला समोर; भावूक होत म्हणाला 'मी आता ठरवलंय...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमधील पराभवानंतर पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.   

शिवराज यादव | Updated: Dec 13, 2023, 05:37 PM IST
WC पराभवानंतर मैदानात रडलेला रोहित शर्मा 20 दिवसांनी आला समोर; भावूक होत म्हणाला 'मी आता ठरवलंय...' title=

वर्ल्डकपमधील पराभवानंतर मैदानात अश्रू अनावर झालेल्या रोहित शर्माने पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये सलग 10 सामने जिंकल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सर्वांना धक्का दिला होता. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा सोशल मीडियापासून दूर एकांतात गेला होता. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही तो खेळत नाही आहे. पण अखेर भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारे आपलं मौन सोडलं असून, यातून नेमकं बाहेर कसं यायचं हे समजत नव्हतं असं म्हटलं आहे. 

"पहिल्या काही दिवसांमधअये मला यातून बाहेर कसं पडायचं हेच समजत नव्हतं. मला काय करावं हे माहित नाही. माझे कुटुंब, मित्रांनी मला या काळात फार मदत केली. त्यांनी माझ्या सभोवताली सकारात्मक वातावरण राहील याची काळजी घेतली. या गोष्टी पचवणं फार अवघड असतं, पण आयुष्य पुढे सरकत असतं. पण खरं सांगायचं तर ते फार कठीण होतं. फक्त पुढे निघून जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. मी नेहमीच 50 षटकांचा वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. माझ्यासाठी 50 षटकांचा विश्वचषक हेच अंतिम बक्षीस होते," असं रोहित शर्मा म्हणाला. 

"आम्ही इतकी वर्षं या वर्ल्डकपसाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे वाईट वाटणं साहजिक होतं. जर तुम्ही यातून पुढे गेला नाहीत, तुम्हाला जे हवे आहे ते मिळालं नाही, तुम्ही या सर्व काळापासून जे शोधत होता, ज्याचं तुम्ही स्वप्न पाहत होतात...तर तुम्ही निराश व्हाल आणि संतापही होतो. काही वेळा मला वाटायचे की आम्ही आमच्या बाजूने जे काही करता येईल ते केले. जर कोणी मला विचारले की काय चूक झाली कारण आम्ही 10 गेम जिंकले आणि त्या 10 गेममध्ये, होय, आमच्याकडून चुका झाल्या. पण त्या चुका प्रत्येक सामन्यात होतात. तुमच्याकडे परिपूर्ण खेळ असू शकत नाही. तुम्ही परिपूर्ण खेळाच्या जवळपास असू शकता. परंतु कधीही परिपूर्ण खेळ होत नाही," असं रोहित शर्माने सांगितलं. 

पण जर तुम्ही दुसरी बाजू पाहिली तरमला माझ्या संघाचा अभिमान आहे. कारण आम्ही अत्यंत चांगले खेळलो होतो. तुम्ही प्रत्येक वर्ल्डकपमध्ये असं खेळत नाही असं रोहित शर्मा म्हणाला. 

पुढे ते म्हणाले की, "पण संघाला वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहून अनेकांना आनंद झाला असेल, खूप अभिमान वाटला असेल. अंतिम सामन्यानंतर तो पराभव पचवणं फार अवघड होतं. त्यामुळेच मी कुठेतरी जाण्याचा आणि यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण मी जिथे जायचो तिथे मला जाणवलं की लोक माझ्याकडे येत आमच्या प्रयत्नांचं कौतुक करत आहेत".

वर्ल्डकप न जिंकल्यामुळे त्यांचीही निराशा झाली असेल. त्यांनीही आमच्यासह वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पाहिलं असेल. प्रत्येकाने आम्हाला इतका पाठिंबा दिला. लोकांनी एक, दीड महिन्यात आमच्यासाठी जे केलं त्यासाठी त्यांचे आभार मला मानायचे आहेत. पण आम्ही अखेरला अपयशी ठरलो याची निराशा झाली आहे. लोक मला येऊन आम्हाला तुमचा फार अभिमान वाटत असल्याचं सांगत आहेत. याचा मला आनंदही होत आहे. अशा गोष्टी ऐकण्याची तुमची इच्छा असते असं रोहित शर्मा म्हणाला. 

लोकांनाही आता खेळाडूंना काय वाटत असेल याची जाणीव असते. लोकांनी मला फार प्रेम दिलं. यामुळे आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची प्रेरणा मिळत, नवं बक्षीस जिंकण्याची इच्छा आहे असंही त्याने म्हटलं.