द्रविडसाठी KKR 'गंभीर'... SRK चा संघ वाटेल ते करायला तयार; पॅकेजचा आकडा पाहून व्हाल क्लिन बोल्ड

Rahul Dravid Likely To Get More Lucrative Offer Than Gautam Gambhir: राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा करार टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबरोबरच संपुष्टात आलेला असतानाच द्रविडनेच आता आपण बेरोजगार असल्याचं मस्करीत म्हटलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 10, 2024, 12:22 PM IST
द्रविडसाठी KKR 'गंभीर'... SRK चा संघ वाटेल ते करायला तयार; पॅकेजचा आकडा पाहून व्हाल क्लिन बोल्ड title=
केकेआर द्रविडसाठी संपूर्ण ताकद लावण्याची दाट शक्यता

Rahul Dravid Likely To Get More Lucrative Offer Than Gautam Gambhir: भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करारमुक्त झाला असून आता त्याची जागा गौतम गंभीर घेणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 9 जुलै रोजी जाहीर केलं आहे. एकीकडे गंभीर कोलकाता नाईट रायडर्सची साथ सोडून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेला असतानाच दुसरीकडे किंग खान शाहरुखच्या मालकीच्या केकेआरने आता रोल स्वाइप म्हणावं त्याप्रमाणे गंभीरच्या जागी थेट द्रविडला केकेआरच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यासाठी हलचाली सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

केकेआरकडून टीट फॉर टॅट?

2024 च्या आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या केकेआरला यापूर्वीची दोन्ही पर्व फारशी चांगली गेली नव्हती. दोन्ही पर्वांमध्ये केकेआरचा संघ सातव्या स्थानी राहिला होता. मात्र गंभीरने जादूची कांडी फिरवली आणि तिसऱ्यांदा संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे केकेआरची तिन्ही जेतेपदं ही गंभीरशीसंबंधित आहेत. पहिली दोन जेतेपदं तो कर्णधार असतानाची तर आताचं तो प्रशिक्षक असतानाचं आहे. मात्र आता गंभीर केकेआरची साथ सोडत असताना त्याच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरुन काढण्याचं मोठं आव्हान केकेआर समोर आहे. गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून केकेआरचं मेंटॉरपद सोडून राहुल द्रविडची जागा घेत असतानाच केकेआर टीट फॉर टॅट म्हणावं त्याप्रमाणे गंभीरच्या जागी द्रविडला संघाच्या प्रशिक्षकपदी करारबद्ध करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे 2025 च्या पर्वात द्रविड कोलकात्याच्या संघाला ट्रेनिंग देताना दिसला तर आश्चर्य वाटता कामा नये. 

द्रविडचा शेवटचा सामना कधी झाला?

29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा शेवटचा सामना होता तोच दिवस द्रविडचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा दिवस होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, 2019 मध्ये झालेली एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल यासारखे धक्के पचवत अखेर द्रविड आपल्या प्रशिक्षकपदाचा शेवट गोड करत टी-20 वर्ल्ड कप विजयाचा साक्षीदार झाला. 

नक्की वाचा >> खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'

द्रविड म्हणालेला, मी बेरोजगार होणार

भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना द्रविडने मस्करीत आपण पुढल्या आठवड्यापासून बेरोजगार असणार आहोत, असं म्हटलं होतं. मात्र द्रविडला आता केकेआरबरोबरच इतरही संघाकडून प्रशिक्षकपदासाठी विचारलं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे. या वृत्तानुसार केकेआरकडून द्रविडला करारबद्ध करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जात आहे. गंभीर द्रविडची जागा घेणार असल्याने द्रविडने गंभीरच्या जागी संघाशी संलग्न व्हावं असा केकेआरचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे गौतम गंभीरला भारतीय संघाला प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या 12 कोटी मानधनापेक्षा अधिक पैसे दिले जाणार असतानाच केकेआर त्याहूनही उत्तम पॅकेज द्रविडला देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. 

नक्की वाचा >> लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधा

द्रविडची खणखणीत कारकिर्द...

द्रविडच्या प्रशिक्षकपदासंदर्भात बोलायचं झालं तर 2012 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सर्वात आधी 2014 आणि 2015 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं मेंटॉर पद स्वीकारलं. त्याचवेळी तो 2014 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांच्याबरोबरही मेंटॉर म्हणून गेला होता. त्यानंतर द्रविडला 19 वर्षांखालील भारतीय संघाचं प्रशिक्षक करण्यात आलं. 2018 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाखालीच भारताने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला.

नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली

द्रविडने प्रशिक्षण दिलेले ऋषभ पंत, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर यासारख्ये हिरे भारतीय संघाला यामधून गवसले. 2016 मध्ये द्रविडने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं मेंटॉरपदही भूषवलं. आता तो आगामी आयपीएल पर्वामध्ये कोणत्या संघाबरोबर करार करतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार असलं तरी केकेआर द्रविडला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पूर्ण बळ लावणार यात शंका नाही.