Saif Ali Khan Attack Shocking News: अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर चाकू हल्ला झाल्यावर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता अशी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या शरीफुल इस्लाम सज्जद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीरने चाकूने हल्ला केला. यानंतर या सगळ्या प्रकराची माहिती करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, करिनाला यावर काहीही प्रतिसाद मिळाला नाही. सैफ अली खानला जेव्हा लिलावती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं त्यावेळेस लिलावती रुग्णालयाकडून पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलीस लिलावती रुग्णालय आणि सैफ अली खानच्या घरी तपासासाठी रवाना झाले. मात्र करिना कपूरने केलेल्या एका चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
सैफ अली खान राहत असलेल्या 'सदगुरू शरण' इमारतीच्या कॉरिडॉर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एक जण केबिनमध्ये तर दुसरा गेटवर झोपला होता, असे तपासात उघड झाले आहे. त्यामुळेच आरोपी हा 10 व्या मजल्यापर्यंत शिड्यांनी तर अकरावा मजला डक परिसरातून पाईपने चढला. आवाज होऊ नये म्हणून आरोपीने स्वतःचे बूट बॅगमध्ये ठेवले होते. त्याने पळताना कपडे बदलले आणि स्वतःचा फोन बंद ठेवला होता.
आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने घेतलेली सर्व खबरदारी पाहता आरोपी बांगलादेशमध्येही सराईत गुन्हेगार असावा, असा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शरीफुलला पुन्हा 'सदगुरू शरण' इमारतीमध्ये नेऊन सैफवर केलेल्या हल्ल्याचे पोलिस रिक्रिएशन 21 जानेवारीच्या पहाटे करण्यात आलं. त्यामधूनही बरीच माहिती उघड होईल, असे तपास अधिकारी म्हणाले आहेत.
आरोपी ईमरतीमधून तोंडावरचा कपडा काढून पळाला होता. पोलिसांनी फेस रेकग्नायजेशन अॅपच्या मदतीने अंधेरी ते वांद्रे परिसरात त्याचा शोध घेतला. तो 1 आणि 9 जानेवारी रोजी अंधेरीमध्ये दिसला. 9 जानेवारीचे फुटेज तपासल्यावर अंधेरीत ज्या लेबर कंत्राटदारासोबत गेला त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिस कंत्राटदारापर्यंत पोहोचले. त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
करिनाने आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन हल्ल्याची माहिती दिली. मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. अखेर रुग्णालयात सैफला दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आल्यावर पोलीसांची एक टीम सैफच्या घराकडे तर दुसरी रुग्णालयाकडे रवाना झाली. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 20 ते 25 मिनिटे गेल्याने आरोपीला पळून जाण्यास तितका वेळ मिळाला. जर हल्ला होताच करिनाने पोलिस अधिकाऱ्याऐवजी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.